Join us

‘वॉर्ड ऑफिसर चोर आहे’; मनसेचे अनोखे फोटो प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 1:08 AM

अनधिकृत फेरीवाल्यांना विरोध करत असताना, काही दिवसांपूर्वी मनसेचे वॉर्ड अध्यक्ष संतोष धुरी आणि मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर यांच्यात धक्काबुक्की झाली होती.

मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांना विरोध करत असताना, काही दिवसांपूर्वी मनसेचे वॉर्ड अध्यक्ष संतोष धुरी आणि मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड आॅफिसर यांच्यात धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर, या प्रकरणी मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात वरळी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता यापुढे जाऊन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचे फोटो जमा करून, त्याचे प्रदर्शन मनसेने भरविले आहे.‘वॉर्ड आॅफिसर चोर आहे’ असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले आहे़ मुंबई मराठी पत्रकार संघात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.हे प्रदर्शन भरविण्यामागचा उद्देश हा आहे की, मुंबईतील पायाभूत प्रश्नांवर वेळोवेळी मनसेने आंदोलने केली आहेत. मग तो फेरीवाल्यांच्या प्रश्न असेल, खड्ड्यांचा असेल, मेट्रो शेडचा असेल, गणेशोत्सव मंडपाचा असेल, नाहीतर दहीहंडीचा असेल. वॉर्ड आॅफिसर फेरीवाल्यांवर कारवाई करत नाहीत, म्हणून त्यांच्याविरुद्ध मनसेने आंदोलन केले. २ महिने संतोष धुरी फेरीवाल्यांच्यावर कारवाई करा, म्हणून मागे लागले होते, पण अधिकारी दुर्लक्ष करत होते. संतोष धुरी जाब विचारायला गेले, तर जैन हा वॉर्ड आॅफिसर त्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्यावर धावून गेला, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या वेळी बोलताना दिली.अधिकारी जनतेचे नोकर आहेत. मग ते त्यांची कर्तव्य का पार पाडत नाहीत? याचा जाब त्यांना विचारायला नको का? एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर न्यायालयाने रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या आत कोणत्याही फेरीवाल्यांना बसता येणार नाही, असा आदेश दिला आहे. या आदेशाला अधिकाºयांनी केराची टोपली दाखविली आहे़ हे फोटो प्रदर्शन त्याचाच पुरावा आहे. गेली २५-२८ वर्षे सेना-भाजपाची महापालिकेत सत्ता आहे. हे प्रदर्शन त्यांच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट कारभाराचा नमुना आहे, असे देशपांडे यांनी सांगितले़

टॅग्स :मनसेमुंबई