कोरोनाविरोधात प्रभागनिहाय वाॅररूम सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:06 AM2021-03-01T04:06:23+5:302021-03-01T04:06:23+5:30
मुंबई : कोविडचे रुग्ण वाढू लागल्यावर महानगरपालिकेने ‘सप्टेंबर’ फॉर्म्युला वापरण्यास सुरुवात केली आहे. यानुसार आता प्रभाग कार्यालयांमार्फत संकुलांना स्मरणपत्र ...
मुंबई : कोविडचे रुग्ण वाढू लागल्यावर महानगरपालिकेने ‘सप्टेंबर’ फॉर्म्युला वापरण्यास सुरुवात केली आहे. यानुसार आता प्रभाग कार्यालयांमार्फत संकुलांना स्मरणपत्र पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. इमारतीच्या आवारात होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी करण्यात आली आहे. यात विशेषतः परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती तत्काळ पालिका प्रभागातील वॉररूमला कळविण्याची सूचना करण्यात आली आहे.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे तीव्र संक्रमण असताना महानगरपालिकेने यंत्रणा ज्या पध्दतीने राबवली त्याच पध्दतीने आता काम सुरू करण्यात आले आहे. कोविड काळात महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयांमार्फत सर्व निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक संकुलांना लेखी सूचना देण्यात आल्या होत्या.
त्याच धर्तीवर आताही सूचना देण्यात येत आहे. कार्यालयांनी ५० टक्के उपस्थिती ठेवावी असे आवाहन करण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
प्रभाग कार्यालयांमार्फत निवासी संकुलांना लेखी स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. त्यात संकुलाच्या आवारात रहिवासी मास्क वापरतील, सामाजिक अंतर राखतील याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाहेरगावरून, परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती प्रभागाच्या वॉररूमला कळविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या एस प्रभागामार्फत विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप परिसरातील संकुलांना अशा नोटीस पाठविण्यास सुरुवात झाली आहे.
बाहेरील व्यक्तींना बंदी
इमारतीत घरकामासाठी येणाऱ्यांचे दैनंदिन तापमान तपासणी आणि ऑक्सिजन पातळी तपासावी. तसेच, शक्य असल्यास काम करणाऱ्या कुटुंबातच राहाण्याची सोय करावी. अशी सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर फेरीवाला, कुरीअर बॉय, लॉड्रीवाला, डिलिव्हरी बॉय यांना इमारतीत प्रवेश देऊ नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.
गृहविलगीकरणात असणाऱ्यांवर करडी नजर
कोविडची बाधा झाल्यानंतर लक्षणे नसलेल्या व्यक्तींना गृहविलगीकरणात राहाण्याची मुभा देण्यात येत आहे. अशा व्यक्तींवरही लक्ष ठेवावे. ती व्यक्ती घराबाहेर पडत असल्यास अथवा सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्यास तत्काळ प्रभागाच्या वॉररूमला कळवावे, असेही या स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.