‘त्या’ महिला वॉर्डनला सक्तीची रजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:36 AM2018-10-16T00:36:19+5:302018-10-16T00:36:28+5:30
प्रकरणाची चौकशी होणार : एसएनडीटी विद्यापीठाकडून समिती स्थापन
मुंबई : जुहू येथील एसएनडीटी विद्यापीठात हॉस्टेलच्या महिला वॉर्डनने जबरदस्तीने अंगावरील कपडे उतरवायला लावल्याचा गंभीर आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घेतली असून सोमवारी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. समितीचा निर्णय येईपर्यंत महिला वॉर्डनला सक्तीच्या रजेवर पाठविल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रभारी रजिस्टार मीना कुटे यांनी दिली.
विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, त्वचेसंबंधीच्या आजारामुळे डॉक्टरांनी तिला बाह्या नसलेला ड्रेस घालण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, ती विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये स्लिव्हलेस ड्रेस घालून गेली. मात्र, असा ड्रेस का घातला याचे कारण विचारताना संबंधित वॉर्डनने नेमके काय झाले आहे, हे दाखव असे सांगत जबरदस्तीने अंगावरचे कपडे उतरवायला भाग पाडले, असा आरोपही या विद्यार्थिनीने केला. तर, विद्यार्थिनी आपल्यावर उगाचच राग काढत असल्याचे महिला वॉर्डनचे म्हणणे आहे.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत समिती स्थापन केली. ही समिती येत्या तीन दिवसांत अहवाल सादर करून निर्णय देईल, अशी माहिती कुटे यांनी दिली. विद्यापीठात झीरो टॉलरन्स पॉलिसी लागू असून आमच्या ५० हजार विद्यार्थिनींविरोधात काही चुकीचे घडू नये, अशी विद्यापीठाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.