वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाला २१४ कोटींचा निधी मिळालाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 02:56 AM2021-03-10T02:56:23+5:302021-03-10T02:56:56+5:30
ट्रॅकचे काम दिवाळीपासून बंद; पण सरकार म्हणते वेगाने काम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ/वर्धा : विदर्भ-मराठवाड्यात वेगवान कनेक्टिव्हिटीची आशा असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या बहुप्रतीक्षित रेल्वेमार्गाची सोमवारी विधिमंडळात सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाने घोर निराशा केली. या रेल्वेमार्गासाठी राज्याच्या वाट्याचे २१४.१० कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात रुपयाही मिळाला नाही. उलट अर्थमंत्री अजित पवार यांनी या मार्गाचे काम वेगात सुरू असल्याचे सभागृहात ठासून सांगितले. मात्र, ‘लोकमत’च्या ‘रिॲलिटी चेक’मध्ये गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या निधीअभावी काम बऱ्याच ठिकाणी थांबल्याचे आणि काही ठिकाणी कासवगतीने सुरू असल्याचे दिसून आले.
फेब्रुवारी २००८ मध्ये वर्धा-यवतमाळ-नांदेड हा २८४ किलोमीटरचा रेल्वे प्रकल्प जाहीर झाला. ११ फेब्रुवारी २००९ ला तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या मार्गाचे भूमिपूजन झाले. तेव्हापासून या मार्गाच्या निर्माणात सातत्याने निधीचे अडथळे निर्माण होत आहेत. केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के निधीचा वाटा या प्रकल्पात आहे. २७४.५३ कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पाची किंमत आता २५०० कोटींवर गेली आहे. या प्रकल्पाला केंद्र शासन १ हजार १३ कोटी, तर राज्य शासन ४५५.५० कोटी रुपये देणार आहे. यापैकी राज्य शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून २१४.१० कोटी रुपयांचा निधी मिळालेला नाही.
प्रकल्पाचे काम खरोखरच वेगाने सुरू आहे का, याची खातरजमा करण्यासाठी ‘लोकमत’चे कळंब येथील तालुका प्रतिनिधी गजानन अक्कलवार यांनी कळंब ते देवळी व यवतमाळदरम्यान मंगळवारी या रेल्वेमार्गाच्या कामांना ठिकठिकाणी भेटी दिल्या. तेव्हा रेल्वे ट्रॅकचे दिवाळीपूर्वी बंद झालेले काम अद्यापही सुरू न झाल्याचे आढळून आले. काही ठिकाणी पुलांचे काम मात्र संथगतीने सुरू आहे. तेथील मजुरांनीसुद्धा ट्रॅकचे काम गेल्या सहा महिन्यांपासून बंदच असल्याचे सांगितले. कामच बंद असल्याने या प्रकल्पावरील वाहने व यंत्रे एकाच जागेवर उभी आहेत.
रेल्वे प्रकल्प पोहोचला अडीच हजार कोटींवर
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाचे नियोजन व देखरेख करणारे उपमुख्य अभियंता प्रशांत निलकवार (वर्धा) यांनी यासंदर्भात ‘लोकमत’ला दिलेली माहिती अशी-
१२ वर्षांपूर्वी या प्रकल्पाची किंमत २७४ कोटी ५३ एवढी होती. आज हा प्रकल्प २५०० कोटींवर पोहोचला आहे.
केंद्र सरकारकडून दरवर्षी सरासरी शंभर कोटी रुपये निधी दिला जातो. यावर्षीसुद्धा १०५ कोटी आले आहेत.
राज्याचा ४० टक्के वाटा असून, त्यातून निधी अद्याप मिळालेला नाही. यंदा २४२ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते.
राज्य सरकारकडून निधीबाबत कोणताही संदेश रेल्वे विभागाला मिळालेला नाही. राज्याकडून आतापर्यंत एकूण ४४५ कोटी रुपये मिळणे बाकी आहे.
वर्धा ते कळंबपर्यंत ५० टक्के काम झाले आहे. यवतमाळपासून पुढे निविदा काढल्या गेल्या असून, भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे. सध्या रेल्वे पुलांचे काम सुरू असून, त्यानंतर ट्रॅकचे थांबलेले काम पुढे नेले जाणार आहे.