वऱ्हाडी बसला अपघात
By admin | Published: May 21, 2017 02:28 AM2017-05-21T02:28:44+5:302017-05-21T02:28:44+5:30
मुंब्रा येथे लग्नाच्या स्वागत समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी बसचा शनिवारी दुपारच्या सुमारास पवईत अपघात झाला. या भीषण अपघातात १ ठार तर १७ जण जखमी
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंब्रा येथे लग्नाच्या स्वागत समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी बसचा शनिवारी दुपारच्या सुमारास पवईत अपघात झाला. या भीषण अपघातात १ ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पार्क साइट पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालाड येथून डेस्टर्नी ट्रॅव्हल या बसने मुलीकडचे वऱ्हाडी मुंब्रा येथे निघाले होते. या वेळी बसमध्ये ३५ ते ४० जण होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास पवई गांधीनगर जंक्शन येथून वळण घेत असताना, चालक धनोजचा गाडीवरचा ताबा सुटला. बस दुभाजकाला धडकत उतारावरून खाली कोसळून पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डिझेलची टाकी फुटल्याने आॅइल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरले होते. स्थानिकांनी बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. त्यांना राजावाडी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्तांना वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली.
या अपघातात नातेवाईक इम्तियाज शेखचा जागीच मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी हा लग्नसोहळा पार पडला होता.
या घटनेमुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे. रेहान शेख (१), इकरा शेख (५), सचिन शेख (२५), अफताब शेख (२८), मरीयम शेख (४०), यसीन शेख (३८), रियाज मोहम्मद मागरा (२६), शईन मागराणी (३४), नसीम नुर मोहम्मद अली (४०), सायरा खान (४५), खैरुन्नीसा शेख (५२), हुसेनबानू शेख (५२), चंद्रशेखर विश्वकर्मा (३६) यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अन्य चार जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पार्क साइट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास जाधव यांनी दिली.
चालकावर गुन्हा दाखल
बस चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच माझ्यासह मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढणे एवढेच डोळ्यासमोर होते. हातानेच बसची काच फोडून आतून जखमींना बाहेर काढले. इतर मित्रांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. - अश्विन भागवत, प्रत्यक्षदर्शी