Join us  

जे जे रुग्णालयाचे वॉर्ड चकाचक होणार, ८ कोटी ४६ लाखाच्या खर्चास मंजुरी

By संतोष आंधळे | Published: February 16, 2024 9:59 PM

पाच महिन्यापूर्वी जे जे रुग्णाललायतील वॉर्ड क्रमांक २१ या उर शल्यविभागाचे नूतनीकरण जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून करण्यात आले होते.

मुंबई : राज्य शासनाचे मुख्य रुग्णालय असलेल्या जे जे रुग्णालय असून या ठिकाणी राज्यातील विविध भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयातील काही वॉर्ड इतके जुने होते कि त्यांची अनेक वर्ष डागडुजी करण्यात आली नव्हती. त्यापैकी काही वॉर्ड्सचे नूतननीकरण करण्याची गरज होती. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील पहिला मजला ते चौथ्या मजल्यावरील एकूण ७ वॉर्ड्स चकचक करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यासाठी विभागाने  ८ कोटी ४६ लाखाच्या खर्चास मंजुरी दिली आहे.

पाच महिन्यापूर्वी जे जे रुग्णाललायतील वॉर्ड क्रमांक २१ या उर शल्यविभागाचे नूतनीकरण जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून करण्यात आले होते. या वॉर्डचे उदघाटन झाल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली होती. या रुग्णलायतील इतर वॉर्ड्स सुद्धा अशा पद्धतीने तयार करण्यात यावे अशी मोठी मागणी होत होती. कारण या वॉर्डचे नूतनीकरणानंतर संपूर्ण रुपडे पालटले होते. खासगी रुग्णलायतील वॉर्ड्सला ही लाजवेल अशा पद्धतीने हा वॉर्ड तयार करण्यात आला होता . अत्याधुनिक सुविधा या वॉर्ड मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

गेल्या काही महिन्यापासून जे जे रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे डागडुजीचे काम हाती घेण्यात आले असून युद्धपातळीवर हे वॉर्ड तयार करण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे मुख्य रुग्णालयासमोरील असणारे गोल गार्डनचे सुद्धा नूतनीकरण करण्यात आले असून त्या ठिकाणी पाण्याची लहान कारंजी सुरु करण्यात आली आहे.  त्यानंतर आता रुग्णालयातील पहिला मजला ते चौथ्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक २४, १७, १९, २२, १४, १२, ९ आणि क्रिटिकल केअर युनिट विभागासमोरील व्हरांडाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.  

राज्यातील कुठल्याही सार्वजनिक रुग्णालयात मध्ये कमालीची अस्वच्छता पाहायला मिळत असते. मात्र जे जे रुग्णालय प्रशासनाने गेली काही महिने स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे त्यांना काही महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. रुग्णालायत जर वॉर्ड्स स्वच्छ आणि सुंदर असतील तर  रुग्णाला सुद्धा उपचार घेताना चांगले वाटते. अनेकवेळा काही रुग्ण वॉर्ड्स अस्वच्छ असल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्यास टाळाटाळ करत असतात. मात्र जे जे रुग्णालयातील वॉर्ड्स मध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे रुग्णांना आता चांगल्या सुविधा प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :हॉस्पिटलराज्य सरकार