‘वारी लालपरीची’ फिरते प्रदर्शन; निवडक बस स्थानकावर प्रदर्शित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 02:05 AM2019-06-06T02:05:19+5:302019-06-06T02:05:35+5:30
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रदर्शन केले जाणार आहे. १० जूनपासून प्रदर्शनास सुरूवात केली जाणार असून राज्यातील ५० शहरांमध्ये लालपरी फिरून प्रवाशांना एसटीची माहिती देणार आहे.
मुंबई : एसटी महामंडाळाच्यावतीने ‘वारी लालपरीची’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. याद्वारे एसटीमधील विविध योजना आणि सवलती यांची माहिती फिरत्या प्रदर्शनातून दाखविण्यात येणार आहे. १० जूनपासून राज्यातील ५० निवडक बस स्थानकावर ‘वारी लालपरीची’ उपक्रम प्रदर्शित केला जाईल.
१० जून रोजी बोरीवली येथील सुकुरवाडी बस स्थानकापासून लाल परीच्या वारीला सुरूवात होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवाशांना, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व नागरिकांना पाहता येणार आहे. मागील चार ते पाच वर्षांमध्ये एसटी महामंडळात झालेले बदल प्रदर्शनात दाखविले जाणार आहे. यात लाल डब्यापासून रातराणी, शिवशाही, शिवनेरी, विठाई कशी निर्माण झाली. नव्या बस स्थानकांची निर्मिती, नव्या बस थांब्याचे नकाशे, सीसीटीव्ही, प्रवाशांसाठी अपघात सहाय्यता निधी व विविध योजना, सवलती, विद्यार्र्थ्यांच्या सुविधा यांची माहिती प्रवाशांना दिली जाणार आहे. ११ जून रोजी वसई, १२ जून रोजी पालघर, १३ जून रोजी ठाणे, १४ जून रोजी कल्याण, १५ जून रोजी अलिबाग बस स्थानकावर वारी लालपरीचे प्रदर्शन दाखविले जाईल. सर्व बस स्थानकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी वेळ असणार आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रदर्शन केले जाणार आहे. १० जूनपासून प्रदर्शनास सुरूवात केली जाणार असून राज्यातील ५० शहरांमध्ये लालपरी फिरून प्रवाशांना एसटीची माहिती देणार आहे. यासाठी ५० दिवसांचे नियोजन तयार केले आहे. दापोली येथे अनोखा चित्ररथ तयार केला असून प्रदर्शनात याचा वापर केला जाणार आहे. एसटी तिथे रस्ता, रस्ता तिथे एसटी, महाराष्ट्राची लोकवाहिनी अशा एसटीबद्दलची सुभाषिके एसटीच्या बाहेरील बाजूस लिहिण्यात आली आहेत, असे बस फॉर अस फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष रोहित धेंडे यांनी सांगितले.