Waris Pathan: मनसेचा वारिस पठाणांना गंभीर इशारा; 'आम्ही' 'तुम्ही' असले भेद मान्य नाहीत. पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 07:06 PM2020-02-20T19:06:15+5:302020-02-20T19:08:20+5:30
Waris Pathan Controversial Statement: भाजपानेही याबाबत एमआयएमवर निशाणा साधला आहे. वारिस पठाण यांचं भाषण देशविघातक आहे, त्यांनी आव्हान देण्याचं काम करु नये
मुंबई - एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर मनसेकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे.
मनसेने याबाबत ट्विट करुन म्हटलंय की, 'आम्ही...' 'तुम्ही...' असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण.... 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके... अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल अशा शब्दात इशारा दिला आहे. त्याचसोबत राज ठाकरेंच्या भाषणातील जुना व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणतात की, जर काही वेडवाकडे या महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. रस्त्यावर बाहेर काढून फोडीन काढेन असं त्यांनी म्हटलं आहे.
'आम्ही...' 'तुम्ही...' असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण.... 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके... अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल!#मनसेदणका 👊 https://t.co/nuaQ2BuI9H
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 20, 2020
भाजपानेही याबाबत एमआयएमवर निशाणा साधला आहे. वारिस पठाण यांचं भाषण देशविघातक आहे, त्यांनी आव्हान देण्याचं काम करु नये, आंदोलनाच्या माध्यमातून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, वारीस पठाण यांचे बापजादे आले तरी भारी पडण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांना स्वातंत्र्याचा इतिहास माहिती नाही, त्याचसोबत आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत, इथल्या देशातला नागरिक स्वस्थ बसणार नाही, खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी वारिस पठाण यांना दिला आहे.
तर वारिस पठाण यांनी केलेलं वक्तव्य अतिशय जहरी आहे, वारंवार ही मंडळी अशी विधान करतात, सर्व आंदोलन शांततेत होत असताना कुठेही गालबोट लागले नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक आहे, सरकार लोकांचे म्हणणं ऐकून घेत आहे, अशा स्थितीत वारीस पठाण भडकवण्याचे काम करतायेत, हे देशविघातक आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, राज्य सरकार यावर कठोर पाऊल उचलेल असा विश्वास शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले होते वारिस पठाण?
'आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असं वादग्रस्त विधान वारिस पठाण यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी
मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा
कीर्तनातील 'त्या' वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांनी केला मोठा खुलासा; कारवाई टळली
Video: 'या' मुस्लीम मुलीचं शिवरायांवरील भाषण ऐकून अंगावर शहारा येईल; सोशल मीडियात कौतुक
आता 'रामायण एक्स्प्रेस' धावणार, प्रवाशांना घेता येणार भजन-कीर्तनाचा आनंद!