वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाचे मुंबईत उमटले तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 02:23 AM2020-02-21T02:23:43+5:302020-02-21T02:24:09+5:30

पठाण यांनी शिर्डीला जावे आणि श्रद्धा सबुरी शिकावी. देश सगळ्यांचा आहे लक्षात ठेवा

Waris Pathan's troubling statement emerged in Mumbai | वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाचे मुंबईत उमटले तीव्र पडसाद

वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाचे मुंबईत उमटले तीव्र पडसाद

Next

मुंबई : एमआयएमचे भायखळा येथील माजी आमदार वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आम्ही १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी आहोत, असे विधान पठाण यांनी कर्नाटकात कलबुर्गी येथील सभेत केले होते. पठाण यांच्या या विधानावर भाजप, मनसेसह सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून या वक्तव्याचा निषेध होत आहे. पठाण यांच्या विधानाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सीएए आंदोलनातील शक्तिप्रदर्शनाबाबत दिलेला इशारा खरा ठरविल्याचे मनसे नेत्या शालिनी ठाकरे म्हणाल्या. भारतात सगळे हिंदुस्थानी राहतात, वारिस पठाण यांनी आपले शब्द परत घ्यावेत. समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही.

पठाण यांनी शिर्डीला जावे आणि श्रद्धा सबुरी शिकावी. देश सगळ्यांचा आहे लक्षात ठेवा, असे शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल
सत्तार म्हणाले. तर, भाजपच्या सांगण्यावरून वारिस पठाण वातावरण दूषित करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र, वारिस पठाण यांचे विधान मुस्लीम समाज ऐकणार नाही. त्यांचे ऐकले गेले असते तर ते निवडून आले असते, असेही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, वारिस पठाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा एमआयएमचे खासदार इम्तियास जलील यांनी केला. आम्ही इतक्या दिवसांपासून सीएएविरोधात आंदोलन सुरू असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर जो जोश माध्यमांनी दाखविला तितका अनुराग ठाकूर आणि योगी आदित्यनाथ यांच्याबाबत का दाखवत नाही, असा प्रश्नही जलील यांनी केला. सुधारित नागरिकत्व कायद्यासह अन्य विषयांवर एमआयएमच्या सभेत वारिस पठाण चिथावणीखोर वक्तव्य केले होते. ‘आता केवळ शब्दांनी उत्तर देऊन भागणार नाही. विटेला दगडाने उत्तर द्यायला आपण शिकलो आहोत. मात्र, आपल्याला एकत्र वाटचाल करावी लागेल. स्वातंत्र्य मागून मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागते. महिलांना पुढे करून आंदोलन केल्याचा टोमणा मारला गेला. आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या आहेत, तर तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो, तर काय होईल. १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा, असे चिथावणीखोर वक्तव्य वारिस पठाण यांनी केले होते. विशेष म्हणजे एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत हे विधान करण्यात आले. मात्र, त्यांनी या वक्तव्यावर कुठलाही आक्षेप घेतला नाही.

Web Title: Waris Pathan's troubling statement emerged in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.