Join us

आदिवासी मुलांच्या कुंचल्यातून छत्र्यांवर अवतरली 'वारली' कला

By संजय घावरे | Published: June 20, 2024 1:56 PM

आरे कॉलनीच्या केल्टीपाडा गावात आयोजित या उपक्रमात चित्रकार सत्येंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनी छत्र्यांवर वारली कलेतील चित्रे रेखाटली.

मुंबई - महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांतील वारली चित्रकलेतील चित्रे छत्र्यांवर रेखाटून आदिवासी व शहरी भागातील मुलांनी पावसाळा सुरू झाल्याचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला. सहयोग आर्ट फाऊंडेशनच्या वतीने आरे कॅालनीमध्ये एका कला सत्राचे आयोजन केले होते. बच्चे कंपनीने मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला.

आरे कॉलनीच्या केल्टीपाडा गावात आयोजित या उपक्रमात चित्रकार सत्येंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनी छत्र्यांवर वारली कलेतील चित्रे रेखाटली. सर्जनशीलतेच्या या उत्साहपूर्ण उपक्रमाने भारतातील सर्वात मोठ्या वारली जमातीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकत देशी कला प्रकारांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या लोक-कलांच्या वारशात 'वारली' कलेला महत्त्वाचे स्थान आहे. वारली कलेचे सौंदर्य तिच्या साधेपणात असून, यात त्रिकोण, वर्तुळे आणि चौरस यांसारख्या मूलभूत भौमितिक आकारांचा वापर केला जातो. 

सांस्कृतिक देवाणघेवाण आणि कलात्मक अभिव्यक्तीला चालना देणारा हा उपक्रम आरे कॅालनीतील आदिवासी समुदायाचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या प्रमिला भोईर आणि मुलगा आकाश यांच्या निवासस्थानी आयोजित केला होता. याबाबत सत्येंद्र राणे म्हणाले की, या उपक्रमाचा उद्देश समृद्ध वारली परंपरेचे जतन करून ही कला तरुण पिढीपर्यंत पोहोवणे आहे. आदिवासी आणि शहरी मुलांना एकत्र आणत आदिवासी परंपरा व त्यांची कला आपल्या जीवनात समाविष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. स्वत: रंगवलेल्या आणि सजवलेल्या छत्र्या घरी घेऊन जाताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाला वेगळेच समाधान देणारा होता असेही राणे म्हणाले.  ग्रामीण समुदायाचा विकासासोबतच आदिवासी आणि वंचित मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सहयोग आर्ट फाउंडेशन आणि अलर्ट सिटीझन फोरम यांनी या उपक्रमाची धुरा सांभाळली.

टॅग्स :पाऊसमुंबई