लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘मोठ्या मार्जारवर्गीय प्राण्यांसोबत सहअस्तित्व आणि त्यातील गुंतागुंत : भारतातल्या महाराष्ट्रातील वारली आणि त्यांचा वाघोबा’ असे शीर्षक असलेल्या अभ्यासात संशोधकांनी वाघोबाला समर्पित असलेल्या १५० देवस्थानांची नोंद केली. रम्या नायर, धी, ओंकार पाटील, निकीत सुर्वे, अनिश अंधेरीया, जॉन डी. सी. लिनेल, विद्या अत्रेय यांनी लिहिलेला हा स्टडी पेपर नुकताच ‘फ्रंटियर्स ऑफ कन्झर्वेशन सायन्स- ह्युमन-वाईल्डलाईफ डायनामिक्स’ या नियतकालिकात ‘वन्यजीवांबरोबरचे सहअस्तित्व समजून घेऊया’ या नावाने प्रकाशित झाला.
डब्ल्यूसीएस-इंडिया व नॉर्वेच्या एनआयएनए, इनलँड नॉर्वे युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेसच्या संशोधकांनी एकत्रितपणे हा अभ्यास केला असून वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्टने पाठबळ दिले. मुंबईची उपनगरे, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात २०१८ ते २०१९ दरम्यान हा अभ्यास करण्यात आला. यावेळी माहिती संकलनासाठी मानववंशशास्त्रीय पद्धतीचा वापर केला. ज्या अंतर्गत संशोधकांनी वाघोबाच्या देवस्थानांच्या नोंदी घेतानाच तेथील लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण केले. मुख्यत्वे पूजा सोहळ्यात सहभागींचे निरीक्षण केले. या मुलाखतींत वारलींच्या जीवनातील वाघोबाची भूमिका, वाघोबाच्या पूजेचा इतिहास, त्याच्याशी संबंधित सण-समारंभ, विधी, परंपरा आणि मानव-बिबट्या यांच्यातील परस्परसंबंधांशी वाघोबाचे नाते समजून घेण्याच्या उद्देशाने प्रश्न विचारण्यात आले.मानव-वन्यजीव यांच्यातील परस्परसंबंधांकडे बघण्याच्या दृष्टिकोन आणि त्यांना समजून घेण्याच्या पद्धतींत विविधता आणणे हे अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
दगडावरील वाघोबा : या अभ्यासात वारलींचा परस्पर सहकार्यावर आधारित संबंधांवर विश्वास असल्याचे आढळून आले. त्यांच्या मते, जर त्यांनी वाघोबाची पूजा केली आणि त्यासाठी आवश्यक विधी केले तर वाघोबा वाघ-बिबट्यांच्या क्षेत्रात राहताना त्यांचे संरक्षण करेल.