तापमानवाढ होण्यासह अतिवृष्टीचा धोका वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:56 AM2019-11-11T05:56:44+5:302019-11-11T05:56:47+5:30
हरितगृह वायू असेच उत्सर्जित होत राहिले, तर देशातील सरासरी तापमानात ४ अंश सेल्सिअसची वाढ होईल.
मुंबई : हरितगृह वायू असेच उत्सर्जित होत राहिले, तर देशातील सरासरी तापमानात ४ अंश सेल्सिअसची वाढ होईल. परिणामी, उष्णतेमध्ये वाढ झाल्याने २१०० सालापर्यंत देशभरात दरवर्षी जवळजवळ १५ लाख लोकांचा मृत्यू होईल, तसेच अतिवृष्टीचा धोका वाढणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील ६४ टक्के मृत्यू वाढत्या तापमानामुळे होतील, अशी भीती एका संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे.
टाटा सेंटर फॉर डेव्हलपमेंटद्वारे युनिव्हर्सिटी आॅफ शिकागोत करण्यात आलेल्या संशोधनानंतर ही बाब समोर आली आहे. या संशोधनात जागतिक तापमानवाढीचा आयुष्य आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? या अभ्यास करण्यात आला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे काही दशकांनी ३५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात येत असलेल्या उष्ण दिवसांचा सरासरी आकडा आठ पटीने वाढेल आणि हे प्रमाण ४२.८ टक्के एवढे होईल.
२१०० सालापर्यंत देशातील १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सरासरी तापमान ३२ अंशांपेक्षा अधिक असेल. वाढत्या तापमानाचा फटका साहजिकच नागरिकांच्या आरोग्याला बसेल आणि याचा परिणाम म्हणून मृत्यूच्या दराचे प्रमाण वाढेल. वाढत्या तापमानामुळे देशभरात वर्षाला १५ लाखांहून अधिक लोकांचा जीव जाईल. वाढत्या उष्णतेचा फटका उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला बसेल. या राज्यांत ६४ टक्के मृत्यू वाढत्या तापमानामुळे होतील. दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, तापमानात वाढ होतच राहिली, तर २१०० सालापर्यंत समुद्राची पातळी एक मीटरने वाढेल, असे या संशोधनातून समोर आले आहे.
>पावसाळ्यातला जुलै महिना सर्वाधिक उष्ण
जुलै महिन्यात जगभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे हा महिना पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठरला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, १९ जुलै रोजी सांताक्रुझ वेधशाळेत कमाल तापमान ३६.२ नोंदविण्यात आले होते. सर्वसाधारण कमाल तापमानाच्या तुलनेत हे कमाल तापमान ६ अंशाने अधिक होते. जुलै महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमाल तापमान होते. २२ जुलै, १९६० रोजी ३४.८ एवढ्या तापमानाची नोंद झाली होती.स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत मान्सूनच्या हंगामात सर्वाधिक वेळेस तीन अंकी पाऊस होण्याची नोंद या वर्षी झाली आहे. एवढा मोठा पाऊस होण्यास जागतिक तापमानवाढ, हवामान बदल कारणीभूत आहेत.
>मुंबईही धोकादायक यादीत
जागतिक तापमानवाढीसह वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे प्रशांत, हिंदी आणि अटलांटिक महासागरातील ३५ देश चिंतेत आहेत. युनोच्या १९९६च्या अहवालात नमूद केले आहे की, सागरी पातळीतील वाढ सुरू झाली आहे. मुंबई, न्यूयॉर्क, शांघायसारखी शहरे धोक्यात आली आहेत.