बेस्ट कृती समितीने दिला संपाचा इशारा; मुंबईकरांचे होणार हाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:37 AM2019-09-10T02:37:41+5:302019-09-10T06:41:25+5:30
परळ येथील शिरोडकर शाळेच्या सभागृहात बेस्ट कामगारांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राव यांनी पत्रकारांना सांगितले
मुंबई : बेस्ट उपक्रमाने शिवसेना प्रणीत बेस्ट कामगार सेनेबरोबर केलेला नवीन वेतनश्रेणी करार कृती समितीने मात्र अमान्य केला आहे. हा करार घातक असून कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृती समिती ठाम आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला लवकरच संपाची नोटीस देण्यात येईल, असा इशारा बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सोमवारी दिला.
परळ येथील शिरोडकर शाळेच्या सभागृहात बेस्ट कामगारांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राव यांनी पत्रकारांना सांगितले. बेस्ट उपक्रमाने अन्य कामगार संघटनांबरोबर केलेला सामंजस्य करार कामगारांसाठी घातक आहे. त्यामुळे इंडस्ट्रियल अॅक्टअंतर्गत बेस्ट प्रशासनाला संपाची नोटीस देणार असल्याचे ते म्हणाले. कृती समितीशी संलग्न कोणतीही संघटना सामंजस्य करारावर सह्या करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.