म्हाडाचा खुलासा : महावीरनगर येथील गाळ्यांची विक्री बेकायदा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळे हे तात्पुरत्या स्वरूपातील निवारा म्हणून प्रकल्पबाधितांना दिले जातात. म्हाडा कायद्यातील तरतुदींनुसार संक्रमण शिबिरातील गाळे विकता येऊ शकत नाहीत, असा खुलासा करत नागरिकांनी यासंदर्भात कोणत्याही प्रकारे पैशांचे व्यवहार करू नयेत, असे आवाहन म्हाडाने केले.
कांदिवली येथे बांधकाम सुरू असलेल्या महावीरनगर येथील संक्रमण शिबिरातील गाळे स्वस्त दरात सोडत प्रक्रिया वगळता उपलब्ध करून देतो, असे सांगून म्हाडाचे खोटे दस्तावेज तयार करून नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून म्हाडातर्फे एफआयआर दाखल केला जाणार आहे.
दरम्यान, म्हाडाच्या सदनिका पारदर्शक संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारेच वितरित केल्या जातात. याकरिता कोणत्याही प्रतिनिधीची, मध्यस्थांची, दलालांची नेमणूक केली जात नाही. मध्यस्थांमार्फत दाखविण्यात येणारे दस्तावेज खोटे असून यात म्हाडातील अधिकाऱ्याचा संबंध नाही. म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या सदनिका जाहीर संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारे वितरित केल्या जातात. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविले जातात. अर्जाची रक्कम व अनामत रक्कम नमूद बँकेतच जमा केली जाते. या सर्व प्रक्रियेनंतर सदनिकांची जाहीर संगणकीय सोडत काढण्यात येते, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.
* दलालांवर विश्वास ठेवू नका
दलालांवर विश्वास ठेवू नका. प्रलोभनांना बळी न पडता म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणालीवर आधारित प्रक्रियेतच सहभागी व्हा. म्हाडाकडून मध्यस्थांची, दलालांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. फसगत झाल्यास म्हाडा जबाबदार नाही.
- विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
............................
-----------------