शेतकऱ्यांसाठी इशारा! जरा थांबा, राज्यात मान्सून आल्यावर लगेच करू नका पेरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 04:02 PM2023-06-09T16:02:59+5:302023-06-09T16:04:00+5:30
हवामान विभागाने जाहीर केल्यानुसार काल ८ जून रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला.
पंकज जोशी
राज्यात एका बाजूला आषाढी वारीची लगबग सुरू असताना, दुसरीकडे खरीपाची तयारीही सुरू आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने जाहीर केल्यानुसार काल ८ जून रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला असून आता महाराष्ट्रासह उर्वरित भारतात त्याचे आगमन कधी होणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र शेतकऱ्यांना अजूनही काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
आज सकाळी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि नैऋत्येकडील आणखी काही भाग, मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य राज्यांच्या काही भागांत पुढील २४ तासांत मॉन्सूनची पुढची वाटचाल होणार आहे.
राज्यात मान्सून कधी?
दरवर्षी केरळमध्ये १ जूनच्या सुमारास दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर ७ ते ८ जूनच्या दरम्यान धडकतो. मात्र यंदा केरळातच मॉन्सून उशिरा दाखल झाला असल्याने राज्यातही तो आठ ते दहा दिवसांनी उशिरा म्हणजेच १८ ते १९ जून रोजी दाखल होऊ शकतो असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यानुसार अनेकांनी पेरण्यांचे नियोजन केले आहे. पण असा तारखेवरून अंदाज लावणे चुकीचे असून प्रत्यक्षात त्यापेक्षाही उशीर होऊ शकतो, असे हवामानतज्ज्ञ आणि अभ्यासक सांगत आहे.
‘‘यंदा राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कमी असण्याचे संकेत आहेत आणि ते आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहेत,’’ ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितलं. डॉ. रामचंद्र साबळे यांनी तयार केलेल्या मॉन्सून मॉडेलनुसार ही शक्यता वर्तविली आहे. त्यासाठी राज्यातील १५ हवामान स्थानकांतील माहितीच्या विश्लेषणाचा आधार घेतला जातो. त्यात प्रामुख्याने विदर्भातील नागपूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर मराठवाड्यातील परभणी, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, दक्षिण महाराष्ट्रातील राहुरी, पुणे, कराड, कोल्हापूर व सोलापूर, तर कोकणातील दापोली या ठिकाणाच्या हवामान अभ्यासाचा समावेश आहे.
कोकणातच यंदा पाऊस ९५ टक्के असण्याची शक्यता असून, कोकणातच नसेल, तर राज्यात उर्वरित ठिकाणी काय स्थिती असू शकते याची कल्पना करता येईल?’’ असे डॉ. साबळे सांगतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे १५ हवामान स्थानकांतील बहुतेक ठिकाणी मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान वाऱ्याचा वेग कमी आढळला. त्यामुळं यंदा मॉन्सूनला फारसा जोर राहणार नाही. तसेच जून आणि जुलैमध्ये पावसाचा खंड पडू शकतो किंवा पाऊस अपुरा पडू शकतो. अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
नॅशनल ओशियन अॅटमॉसफेअरिक अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा एल-नीनो सक्रीय होऊन ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही पाऊस कमी पडणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी किमान ६५ से.मी. पाऊस झाल्याशिवाय किंवा जमिनीत २ ते ३ फूट खोल ओल येईल असा पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये. तसेच कमी कालावधीची, कमी पावसाची पिके घ्यावीत. आपल्या फळबागांची काळजी घ्यावी तसेच असलेल्या पाण्याचा जपून वापर करावा असा सल्लाही डॉ. साबळे यांनी दिला आहे.
चक्रीवादळांचे असेही संकेत :
दरम्यान आजपासून बिपरजॉय वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता असून कर्नाटक, गोवा यांच्या किनारपट्टीच्या प्रदेशाला सावधगिरीचा तसेच मच्छीमारांनाही पुढील तीन दिवस खोल समुद्रात न जाण्याचा इशारा हवामानखात्याने दिला आहे. मात्र वादळ आणि मॉन्सूनची वाटचाल यांचा काही संबंध नसल्याची माहिती हवांमान अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. चक्रीवादळे ही मॉन्सूनपूर्व किंवा मॉन्सून उत्तर काळात तयार होतात. मॉन्सून येऊन स्थिर झाल्यावर वादळे निर्माण होत नाहीत. तरीही या काळात अशी वादळे निर्माण झालीत, तर वातावरणात अस्थिरता आहे, असे वैज्ञानिक तथ्य आहे. मात्र वादळे आणि मॉन्सून यांचा संबंध जोडणे चुकीचे आहे.
या आधीच्या काळात अशी वादळे मार्च-एप्रिलमध्ये यायची. यंदा मात्र जूनमध्ये वादळे येत आहे, ही घटना बदलाचे मोठे संकेत देणारी आहे. म्हणून प्राथमिक निष्कर्षानुसार ही मान्सूननंतरची चक्रीवादळे असण्याची शक्यता असून मॉन्सूनला उशीर होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शेतातील ढेकळं फुटेपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, किंवा आपल्याकडील पूर्वानुभवाचा वापर करून पिकांची निवड करावी असेही प्रा. जोहरे यांनी स्पष्ट केले आहे.
हवामान खात्याने यंदा भारतात ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे, तर काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी पाऊस होऊ शकतो असेही मे अखेरीस प्रसिद्ध केलेल्या अंदाजात म्हटले आहे. मात्र राज्याचा विचार करता शेतकऱ्यांनी अधिक सावध असावे आणि सारासार विचार करूनच पेरणी करावी असा सल्ला डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
'बिपरजॉय' नंतर घोंघावणार 'तेज' चक्रीवादळ!
'बिपरजॉय' हे चक्रीवादळानंतर तेज नावाचे चक्रीवादळ येणार आहे. तेज हे नाव भारताने दिले आहे. तेज चक्रीवादळानंतर अनुक्रमे हमून, मिधिली, मिचौंग, रेमल, आसना, दाना, फेंगल, शक्ति, महिना, सेयर, दितवाह अशी पुढिल अकरा चक्रीवादळांची नावे असतील. विशेष म्हणजे ही सर्व चक्रीवादळांची नावे साधारणतः जून २०२६ पर्यंत आपल्याला पहायला मिळतील अशी माहिती देखील हवामान अभ्यासक प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.