Join us

रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट; आजही जोरदार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 5:42 AM

संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, शुक्रवारीदेखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. २४ जुलै रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.     

२५ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, पालघर, ठाणे, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. २६ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. काळात तुरळक ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने पावसाच्या मोठ्या सरी कोसळत होत्या.

टॅग्स :पाऊसमुंबईपालघररायगड