Join us

अरबी समुद्रात 'महा' चक्रीवादळ; मच्छिमारांनी समुद्रात जाणे धोक्याचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 1:36 PM

महाराष्ट्र, गुजरात, दमण-दीव राज्याच्या मुख्य सचिवांशी कॅबिनेट सचिवांनी संवाद साधला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र, गुजरात, दमण-दीव राज्याच्या मुख्य सचिवांशी कॅबिनेट सचिवांनी संवाद साधला.चक्रीवादळामुळे पालघर, ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पुढील तीन दिवस मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परत यावे.

मुंबई - अरबी समुद्रात महानावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्‌भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. महाराष्ट्र, गुजरात, दमण-दीव राज्याच्या मुख्य सचिवांशी कॅबिनेट सचिवांनी संवाद साधला.

अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ आले असून राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पुढील तीन दिवस (8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे.

चक्रीवादळामुळे पालघर, ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

सध्या मध्य पूर्व अरबी समुद्रात महा चक्रीवादळ आले आहे. येत्या 24 ते 36 तासांत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल आणि त्यानंतर पूर्व  ईशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीकडे वळेल. त्यामुळे पुढील 48 तासांत मुंबईत हलक्या सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवस मुख्यत: उबदार असेल व रात्र आल्हाददायक राहील. दिवसाचे तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान तर रात्रीचे तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. मंगळवारी 5 नोव्हेंबरच्या सुमारास चक्रीवादळ महा मुंबईच्या उत्तरेजवळ येईल. परिणामी, शहरात पावसाचा जोर वाढेल, तसेच 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी शहरात मध्यम पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या काळात मध्यम वारे वाहतील. महा चक्रीवादळ भारतीय किना-यापासून दूर नैऋत्य दिशेने जात आहे. तीव्रतेत वाढ होऊन चक्रीवादळ अति तीव्र होण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत चक्रीवादळ भारताकडे वळण्याची शक्यता असून, पूर्व-ईशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किना-याकडे वळण्याची शक्यता आहे.तीव्र चक्रीवादळ महा हे मागील 6 तासांत 14 किमी प्रति तासाच्या वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आहे. भौगोलिकदृष्ट्या हे वेरावळच्या दक्षिण-नैऋत्येकडे 520 किमी आणि दीवच्या 540 किमी दक्षिण-नैऋत्येकडे आहे. सध्याच्या हवामान प्रारूपांच्या अनुसार, थंड तापमान असलेला समुद्राचा पृष्ठभाग, तसेच वातावरणातील दोन थरांतील वा-यांच्या  वेगातील तफावत मध्यम राहण्याची शक्यता असल्याने चक्रीवादळ वक्र झाल्यानंतर कमकुवत होण्यास सुरुवात होईल, तर 5 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा तीव्र चक्रीवादळाच्या रूपात कमकुवत होईल. त्यानंतर हे आणखी कमकुवत होईल आणि किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वी चक्रीवादळ होईल.

 

टॅग्स :चक्रीवादळमुंबईमहाराष्ट्र