Join us  

आझाद मैदानात काळी दिवाळी साजरी करण्याचा महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांचा इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 7:54 PM

शासनाकडून महाज्योती अंतर्गत राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाते.

-श्रीकांत जाधव

मुंबई : शासनाने महाज्योती अधिछात्रवृत्तीच्या जागा कमी केल्याने विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने या निर्णया विरोधात ओबीसी विद्यार्थ्यांनी आझाद मैदान बेमुदत आंदोलन सुरु आहे. मात्र सरकारकडून अद्याप त्याची दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिवाळीला घरी न जाता सरकार विरोधात आझाद मैदानात काळे कंदील लावून दिवाळी साजरी करण्याचा इशारा महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.

महाज्योती अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज केलेल्या आणि आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसलेल्या विध्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष सद्दाम मुजावर, टाटा इन्स्टिट्यूटचे अतुल पाटील, संदीप आखाडे, तनुजा पंडित, वैभव जानकर यांनी सोमवारी प्रेस क्लब मध्ये माध्यमांशी संवाद साधला.

शासनाकडून महाज्योती अंतर्गत राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती दिली जाते. वर्ष २०१९ मध्ये अर्ज केलेल्या ९५७ विद्यार्थी तर वर्ष २०२२ मध्ये १२२६ विद्यार्थी संशोधकांना फेलोशिप देण्यात आली होती. मात्र त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १ जून २०१३ च्या बैठकीत महाज्योती अधिछात्रवृत्तीसाठी केवळ ५० जागा घोषित करण्यात आला. त्याला राज्यभरातील विद्यार्थांनी विरोध केल्याने अखेर सरकारने जागा वाढवून २०० केल्या आहेत. तरी सुद्धा या २०० जागा एकूण इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग याच्या जातींची संख्या ४१२ असून लोकसंख्येला पूरक नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होत असल्याचे संशोधक विद्यार्थी कृती समितीचे म्हणणे आहे. 

शिवाय आझाद मैदानात आंदोलन सुरु झाल्यापासून शासनाच्या किंवा संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडून ही या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. आंदोलक विद्यार्थ्यांची तब्यते बिघड असल्याने त्याची  शासकीय डॉक्टरांकडून विचारपूस केली जात नाही. त्यामुळे संतप्त संशोधक विद्यार्थांनी येत्या दिवाळी सणाला गावी घरी ही न जाण्याचा निर्णय घेतला आहे. येथेच आझाद मैदानात काळे कंदील लावून शासनाविरोधात काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा  महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.

टॅग्स :महाराष्ट्र सरकार