लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ आणि २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असतानाच २० फेब्रुवारी रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गेल्या २४ तासात राज्यासह मुंबईत अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः मुंबईच्या उपनगरात अवकाळी पाऊस पडला असून, राज्यात येत्या २४ तासात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेली चक्रवाताची परिस्थिती आता ओसरत आहे.
दुसरीकडे उत्तर केरळपासून दक्षिण गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. हवामानातील या बदलामुळे राज्यभरात अवकाळी पाऊस पडत असून, काही ठिकाणी गाराही कोसळत आहेत. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे गेल्या २४ तासात अवकाळी पावसाची नोंद झाली असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे ११ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
.........................
मुंबई शहर आणि उपनगरात कमाल व किमान तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात येत असली, तरी काहीअंशी गारवादेखील टिकून आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईकर पाऊस, गारवा आणि किंचित उकाडा अशा तिहेरी वातावरणाला सामोरे जात आहेत. मुंबईत पुढील २४ तास असेच वातावरण राहील, असादेखील अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.