देवनार बस डेपोजवळील पाकीटमारांची टोळी जेरबंद
By Admin | Published: February 7, 2016 01:30 AM2016-02-07T01:30:17+5:302016-02-07T01:30:17+5:30
देवनार येथील बेस्ट डेपोजवळील रुट क्रमांक ५१७ वर एका हिरेव्यापाऱ्याला लुटणाऱ्या चौकडीला गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर रायभान (३८), मोहम्मद शेख
मुंबई : देवनार येथील बेस्ट डेपोजवळील रुट क्रमांक ५१७ वर एका हिरेव्यापाऱ्याला लुटणाऱ्या चौकडीला गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर रायभान (३८), मोहम्मद शेख (४३), अब्दुल शेख (४३) आणि कयुम कुरेशी (३९) अशी त्यांची नावे असून, त्यांच्याकडून ८४ लाखांचे हिरे जप्त केले आहेत. चौघे जण सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. या बस रुटवर व्यापाऱ्यांचा हवालामार्फत व्यवहार चालतो, या समजुतीने या पाकीटमारांनी परिसरातील नागरिकांना ‘टार्गेट’ केले होते.
२७ जानेवारीला एका नामांकित हिरेजडित कंपनीचा कर्मचारी मनोहरलाल गोखरु यांची २ लाख दागिन्यांसह हिरेजडित दागिन्यांची ९८ लाख किमतीची बॅग चोरी झाल्याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष-६कडून तपास करण्यात येत होता.
या चौकडीचा म्होरक्या रायभान उर्फ मशिन नुकताच एका गुन्ह्यात शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्याच्यावर ६पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. ‘पिक पॉकीटिंग’ करून कंटाळलेल्या रायभानने अब्दुल, मोहम्मद, कयुमला सोबत घेऊन स्वत:ची गॅग बनविली. चौघांनी बेस्ट बस क्रमांक ५१७वरील वाशी ते सांताक्रुझ या मार्गावर पाकीटमारी सुरू केली. या मार्गावर व्यापारी हवालामार्गे व्यवहार करतात, त्यामुळे चोरी झाल्यास संबंधित तक्रारीसाठी पुढे येत नाहीत, या समजाने या मार्गावरील व्यापाऱ्यांना टार्गेट केले होते. याच मार्गात गोखरु यांचे कोट्यवधी रुपयांचे घबाड त्यांच्या हाती लागले. या घबाडाचे काय करू आणि काय नको अशी त्यांची अवस्था झाली. त्यांच्या संशयास्पद हालचाली गुन्हे शाखेच्या तपास पथकाच्या नजरेत पडल्या आणि रॅकेट उद्ध्वस्त केले. अटक चौकडीकडून चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (प्रतिनिधी)