Join us

मुंबई वॉरियर्सचा लढवय्या खेळ

By admin | Published: April 04, 2015 5:45 AM

एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर मुंबई वॉरियर्स एससी संघाने लढवय्या खेळ करताना सेलीब्रेटी एफसीला ४-२ असा धक्का देत मुंबई जिल्हा

मुंबई : एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर मुंबई वॉरियर्स एससी संघाने लढवय्या खेळ करताना सेलीब्रेटी एफसीला ४-२ असा धक्का देत मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना (एमडीएफए) सुपर डिव्हिजन गटात विजयी आगेकूच केली.परळ येथील सेंट झेवियर्स मैदानावर झालेल्या या सामन्यात सुबोध खंडागळे याने वेगवान गोल करताना सेलीब्रेटी संघाला आश्चर्यकारक १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर जोरदार प्रत्युत्तर देताना वॉरियर्स संघाने स्ट्रायकर विशाल वेनू याने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर मध्यंतराला १-१ अशी बरोबरी साधली.या वेळी वॉरियर्स सहज बाजी मारणार असे दिसत होते. मात्र जॉन परेरा याने मिळालेल्या संधीचा फायदा उचलताना वॉरियर्सच्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारली आणि अप्रतिम गोल करीत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या अनपेक्षित पिछाडीमुळे चवताळलेल्या वॉरियर्स संघाने तुफान आक्रमक चाली रचून सेलीब्रेटी संघाला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला.वॉरियर्सने १० मिनिटांच्या अंतराने तीन गोल करताना सामन्याचे चित्रच पालटले. स्ट्रायकर इकेन्ना अहुकन्ना याने मध्यरक्षक हेन्री ओरेजी याच्याकडून मिळालेल्या पासवर चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा देत संघाला पुन्हा एकदा बरोबरी साधून दिली. इकेन्नानंतर ओरेजीने आपले कौशल्य दाखवताना खोलवर आक्रमण करीत गोलरक्षकाला गोंधळात पाडले आणि वेगवान गोल नोंदवून वॉरियर्सला पहिल्यांदाच सामन्यात ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.यामुळे काहीसे दडपणाखाली आलेल्या सेलीब्रेटी संघाचे सामन्यावरील नियंत्रण सुटू लागले आणि याचा पुरेपूर फायदा उचलताना पुन्हा एकदा इकेन्नाने आपला जलवा दाखवला आणि शनादार गोल करून वॉरियर्सच्या ४-२ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबई वॉरियर्सचा तीन सामन्यांतील सलग दुसरा विजय असून त्यांच्या खात्यावर ६ गुणांची कमाई आहे. त्याचवेळी सेलीब्रेटी संघाचा मात्र हा सलग तिसरा पराभव ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)