मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यापासून दिवसरात्र कार्यरत असलेले महापालिकेच्या अन्य विभागातील कर्मचारी आता आपल्या मूळ कामांकडे वळले आहेत. मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने आणखी काही महिने पालिका यंत्रणेला सतर्क राहावे लागणार आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन, कीटक नाशक विभाग, जल अभियंता खाते, आरोग्य सेविका आणि रस्ते व पर्जन्यवाहिन्यांचे काम करणारे कंत्राटी कामगार आपल्या दैनंदिन कामाबरोबरच मुंबईकरांचीही काळजी घेणार आहेत.
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर महापालिकेने आपल्या ५० हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना या लढ्यात उतरवले. मात्र अन्य विभागातील आवश्यक कामे बराच काळ खोळंबली असून कोरोनाचा प्रसारही आता नियंत्रणात आहे.त्यामुळे बहुतांश कर्मचारी आपल्या मूळ विभागात पुन्हा काम करू लागले आहेत. यापैकी काही विभागांचा दैनंदिन कामांमध्ये नागरिकांशी संपर्क होत असतो. त्यामुळे अशा पाच विभागांतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालिका यापुढेही घेणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचारी साफसफाईच्या निमित्ताने सर्वसामान्य मुंबईकरांच्या संपर्कात असतात. अशा वेळी एखाद्या घरातील व्यक्ती आजारी असल्यास त्याची माहिती ते संबंधित विभाग कार्याला देऊ शकतात. जेणेकरून आवश्यकतेनुसार महापालिका आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देईल. या मोहिमेचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना होऊ शकतो. त्यांच्या आरोग्याची काळजी वेळेत घेण्यात आल्यास त्यांना तत्काळ उपचार देऊन बरे करणे शक्य होईल, असा विश्वास पालिकेला वाटत आहे.
सध्या विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि आरोग्य सेविकांमार्फत घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. तसेच विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत कोरोना रुग्ण, त्यांच्या संपर्कातील लोक आणि कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. घनकचरा व्यवस्थापन, कीटक नाशक विभाग, जल अभियंता खाते, आरोग्य सेविका यांचा मुंबईकरांशी दैनंदिन संपर्क होत असल्याने त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेणार आहे. विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी काही यंत्रणा उभी करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. - सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त
बोरीवली, कांदिवली प्रतिबंधित इमारती वाढल्या
1. मुंबई : गणेशोत्सव काळात लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रतिबंधित इमारतींची संख्या ५३६१ वरून आता ६७९७ वर पोहोचली आहे. त्याच वेळी बाधित क्षेत्रांची संख्या ५७० वरून कमी होऊन ५६० वर आली आहे.म्हणजेच झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला असताना इमारतींमध्ये रुग्ण वाढताना दिसून येत आहेत.
2. मिशन बिगीन अगेनच्या चौथ्या टप्प्यात मुंबईतील बहुतांश व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाºयांची संख्या वाढली आहे. याचे परिणाम आता दिसून येत आहेत. ३ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील प्रतिबंधित इमारतींची संख्याही वाढली आहे. बोरीवली विभागात सर्वाधिक म्हणजे ११७१ इमारती रुग्णसंख्या वाढल्याने सील करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ कांदिवली विभागात ६१५ इमारती केल्या आहेत. तत्पूर्वी या विभागांमध्ये सील इमारतींची संख्या अनुक्रमे ५२२ आणि ४३४ इतकी होती.
3. मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा सरासरी दर ०.९० टक्के असताना बोरीवलीत मात्र १.५ टक्के आहे. तसेच या विभागात आतापर्यंत ८७०० रुग्ण आढळून आले आहेत. तर के पूर्व - अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले पूर्व तसेच पी उत्तर मालाड या विभागात सर्वाधिक नऊ हजार रुग्णसंख्या आहे. मात्र या दोन्ही विभागातील रुग्ण दैनंदिन रुग्णवाढीचा दर ०.८० ते ०.९० टक्के एवढा कमी आहे. तसेच के पूर्व विभागात ४४२, तर पी उत्तर विभागात ४५१ इमारती सील आहेत.