कोरोनाला हरवण्यासाठी वॉररूमचे अस्त्र, स्वतंत्र संपर्क क्रमांकही दिला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:05 AM2020-06-08T01:05:32+5:302020-06-08T01:06:08+5:30
खाटा उपलब्ध होण्यातील अडचण दूर होणार : स्वतंत्र संपर्क क्रमांकही दिला जाणार
मुंबई : कोरोना रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्यासाठीची अडचण निकाली काढण्यासाठी विकेंद्रित पद्धतीने रुग्णालय खाटा व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणली जाणार आहे. याकरिता विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉररूम म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यानुसार कार्यवाही वेगाने सुरू असून, वॉर्ड वॉररूम कार्यान्वित केल्यानंतर त्यांचे संपर्क क्रमांक मुंबईकरांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत.
महानगरपालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये थेट येणाऱ्या बाधित, संशयित रुग्णास योग्य ते उपचार देणे, जवळपासच्या जम्बो फॅसिलिटीमध्ये त्यांना दाखल करणे याबाबतचा निर्णय संबंधित रुग्णालयाचे अधिष्ठाता घेणार असून, थेट केंद्रीय नियंत्रण कक्षात खाटांबाबतचे कॉल वॉर्ड वॉररूमकडे वळविण्यात येतील. महापालिकेच्या नागरी मदत सेवा क्रमांक १९१६द्वारे प्राथमिक व्यवस्थापन करण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर त्या अनुषंगाने उपाययोजनांचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने १९१६ सेवेवरून खाटांचे व्यवस्थापन करण्याऐवजी विकेंद्रित पद्धतीने विभाग कार्यालयांच्या स्तरावरून रुग्णांसाठी जलदगतीने खाटा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली. यातून कोविडबाधित रुग्णांना विभाग स्तरावरूनच आरोग्य सेवा देण्यास मदत होणार आहे.
मुख्य नियंत्रण कक्षामध्ये दैनंदिन नागरी तक्रारींसह कोरोनाबाबत विशेष मदत सेवाही सांभाळत असलेल्या १९१६ या हेल्पलाइनवर येत असलेल्या ताणामधून तक्रारींचा प्रतीक्षा कालावधी वाढत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रतीक्षा कालावधी आता कमी होऊन गरजूंना तात्काळ प्रतिसाद मिळणे शक्य होईल. विभागीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नवीन प्रणाली स्थापन करतानाच, तीव्र बाधा असलेल्या कोरोनाबाधितांच्या निवासस्थानी तात्काळ
जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुलभ व जलद होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.
केंद्रीय पद्धतीने १९१६ सेवेवरून खाटांचे व्यवस्थापन करण्याऐवजी विकेंद्रित पद्धतीने विभाग कार्यालयांच्या स्तरावरून रुग्णांसाठी जलदगतीने खाटा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित केली़
वैद्यकीय अधिकारी रुग्णांशी साधणार थेट संवाद
ज्या व्यक्तींना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. ज्यांच्यात लक्षणे नाहीत अशा बाधितांना त्यांचा चाचणी अहवाल आल्यानंतर काही कालावधीनंतरही विभागीय स्तरावरून काही दिवस दूरध्वनीवरून पाठपुरावा केला जाईल. नियंत्रण कक्षांमधून वैद्यकीय अधिकारी रुग्णांशी थेट संवाद साधून सल्लामसलत करणार आहेत. त्यामुळे रुग्णांची नेमकी स्थिती समजून घेणे, गरजेनुसार त्यांना खाटा व औषधोपचार आदी पुरवणे सोपे होईल.
काय आहेत फायदे
वॉर्ड वॉररूममुळे कोरोनाबाधितांना प्रभावी सेवा देण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल.
महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचे विभागनिहाय विकेंद्रीकरण होईल.
स्थानिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देता येणार आहे.
नवी प्रणाली रुग्णांसाठी ठरणार दिलासादायक.
कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने व विकेंद्रित पद्धतीने खाटा उपलब्ध होणार.
विभाग कार्यालयांच्या स्तरावरून रुग्णांना अधिक जलद, सुलभ आरोग्य सेवा मिळणार.
अखंडपणे कार्यरत
च्सर्व विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या विभाग कार्यालय स्तरावर हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावयाचा आहे.
च्वॉर्ड वॉररूममध्ये दिल्या जाणाºया दूरध्वनी क्रमांकाच्या ३० वाहिन्या असतील.
च्तीन सत्रांमध्ये अखंडपणे कार्यरत राहणाºया या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
कसे होईल काम
दररोज कोरोनाबाधित रुग्णांची यादी प्राप्त झाल्यानंतर वॉर्ड वॉररूममधील डॉक्टर या रुग्णांशी संपर्क साधतील.
त्यांना असलेल्या बाधेचे स्वरूप समजावून घेऊन रुग्णास कोविड आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयामध्ये खाट मिळवून देतील.
त्या ठिकाणी रुग्णाला नेण्याबाबतच्या कार्यवाहीमध्ये समन्वय साधला जाईल. तीव्र स्वरूपाची बाधा असल्यास रुग्णाच्या घरी आवश्यक वैद्यकीय साधनांसह जाऊन त्याची तपासणीसह उर्वरित बाबी या स्तरावर केली जाणार आहे.
उपलब्ध सर्व खाटांची माहिती आॅनलाइन अद्ययावत केली जाणार आहे.
विभाग कार्यालयांना कोरोना रुग्णसेवेसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही आता विभागीय कक्षाद्वारे होणार असल्याने रुग्णवाहिकांचा प्रतिसाद कालावधी वाढेल. रुग्णवाहिका सेवेची प्रभावी अंमलबजावणी होईल. यापुढे लक्षणे नसलेल्या अतिजोखीम गटामधील संशयित व्यक्तींची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट खासगी किंवा महापालिकेच्या प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली जाईल.