Join us  

तरुणीच्या भावाने सांगितलं काय घडलं, उशिरा परतणार होती, कायमचीच सोडून गेली !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 9:53 AM

रिक्षा अपघातात दगावलेल्या तरुणीच्या कुटुंबाला दुःख अनावर

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: ‘आई, मी मामा-मामीला फिरवून आणते, घरी परतायला उशीर होईल, असे सांगून माझी बहीण निघून गेली आणि काही तासातच तिच्या मृत्यूची बातमी आम्हाला मिळाली. या घटनेवर विश्वास न बसलेली माझी आई अजूनही ताईच्या परतण्याची वाट पाहत आहे. अलिबागच्या रिक्षा अपघाताची ती बळी ठरली, अशा वर्षा कल्लप्पा कूट (२७) या तरुणीचा भाऊ श्री (२५) याने ‘लोकमत’शी बोलताना भावना व्यक्त केल्या.

वर्षाचा लहान भाऊ श्री याच्या म्हणण्यानुसार, सांगलीतून त्यांचे मामा, मामी हे दोन मुलींसह मुंबई फिरायला आले होते. खासगी कंपनीत काम करणारा श्री हा चारकोपच्या सेक्टर ८ मध्ये त्याची पत्नी, आई सुनीता, वडील कल्लप्पा आणि बहीण वर्षासोबत राहत होता. बोरिवलीच्या गोखले कॉलेजमधून कला शाखेतून शिक्षण पूर्ण करणारी वर्षा मुंबईतील एका वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीत काम करत होती. तिने २१ मे रोजी नातेवाईकांसोबत अलिबागला फिरायला जाण्याचे ठरविले; मात्र तिथे रिक्षामध्ये सर्व बसले असताना चालकाने भरधाव वेगाने गाडी चालविल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती खोल दरीत जाऊन कोसळली. 

ज्यात चालक, मामा- मामी गंभीर जखमी झाले. तर मुलींना किरकोळ दुखापत झाली. या घटनेत वर्षाला मात्र प्राण गमवावे लागले. एकुलत्या एक लेकीची अशी बातमी मिळाल्यानंतर तिच्या आईला या सगळ्यामुळे मोठा धक्का बसला आहे. मी एका खासगी बँकेत काम करतो. सहसा आम्हाला रात्री साडेनऊनंतरच मोबाईलवर बोलण्याची परवानगी मिळते. मात्र २१ मे रोजी माझ्या पत्नीला अस्वस्थ वाटू लागल्याने मी ऑफिसमधून लवकर निघालो आणि त्यानंतर मला बहिणीच्या अपघाती मृत्यूबाबत समजल्याचे श्री म्हणाला. वर्षाच्या मृतदेहावर सोमवारी सांगलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मयताच्या टाळूवरील लोणी ‘आम्ही सध्या आर्थिक समस्येत आहोत. त्यात बहिणीचा मृत्यू झाल्यावर मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा मालक डी. इंदुलकर याने आमच्याकडे १५ हजार मागितले. आम्ही विनंती करून त्याला १० हजार देण्याचे नक्की करत ५ हजार रुपये अनामत रकमेच्या स्वरूपात दिले; मात्र मृतदेह गावी आणल्यानंतर त्याने आमच्याकडून १५ हजार ७०० रुपये घेतले. हा प्रकार मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा असून याबाबत तक्रार करणार असल्याचे श्री याने सांगितले.

टॅग्स :ऑटो रिक्षाअपघात