मुंबईः वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या माजी खासदार आणि भाजपा नेते नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आणीबाणीचा हवाला देत निलेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली, अशा भाषेत भाजपाचे नेते निलेश राणे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांवर टीका केली आहे. शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भाजपाला वीर सावरकरांचा असलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते, स्वातंत्र्य चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?, असे प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आले होते. त्यालाच आता निलेश राणेंनी राणे शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. स्व. बाळासाहेब स्वातंत्र्य लढ्यात होते का??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजींशी बाळासाहेबांनी मांडवली केली, तो इतिहास लोक विसरलेली नसल्याचं म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.
स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणी बाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं होतं की, वीर सावरकर हे त्याग, तत्त्व, तेज आणि संघर्षाच्या बाबतीत सगळय़ांनाच पुरून उरले व हयातभर त्यांचे स्थान अढळ राहिले. सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळय़ांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय? भाजप म्हणते वीर सावरकरांच्या विषयावर कोंडी करू. जे स्वतःच कोंडीत सापडले आहेत त्यांनी दुसऱ्यांची कोंडी करण्याची भाषा करू नये. महाराष्ट्रात सरकारची कोंडी करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारने वीर सावरकरांचा काय सन्मान राखला यावर महाराष्ट्रातील फडणवीस, पाटील, मुनगंटीवार, शेलार आदी मंडळींनी प्रश्न उभे केले पाहिजेत. कालच्या प्रजासत्ताक दिनीही मोदी सरकारने वीर सावरकरांना 'भारतरत्न' का जाहीर केला नाही? यावर महाराष्ट्रातील हे नव सावरकरप्रेमी काही प्रकाश टाकणार आहेत काय? महाराष्ट्राच्या विधानसभेने ठराव करावा वगैरे मागणी ठीक आहे, पण फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वीर सावरकरांना 'भारतरत्न' देण्याविषयी दोन पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठवली होती. त्याचे पुढे काय झाले? त्या पत्रांची दखल केंद्राने घेतली नाही हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचाही अपमान आहे!वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा 'संघ' परिवार कोठे होता? 1947 साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला 'बंदी' उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, ''तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल.'' ही अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली, पण 2002 पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे 'रेकॉर्ड' सांगतेय. राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे देशद्रोही ठरवले जातात. स्वतःस राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱया संघटना 2002 पर्यंत 'राष्ट्रध्वज' फडकवायला तयार नव्हत्या. भगवा ध्वज हे शिवसेनेचेही प्रतीक आहे, पण भगव्याच्या बरोबरीने 'तिरंगा'ही फडकवला जातो हा आपला राष्ट्रवाद असल्याचं सामनाच्या अग्रलेखातून अधोरेखित करण्यात आलं होतं.