मुंबई : राज्य सरकारच्या जाहिरातीत बँकॉकच्या रस्त्याचा फोटो दाखवला गेल्याने गुजरात, मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही विकास वेडा झाला आहे का, असा सवाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारकडून कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती सुरू आहेत. ‘मी लाभार्थी, होय हे माझं सरकार’ अशा टॅगलाइन वापरून या जाहिराती सुरू आहेत. मंत्रालयाच्या तळमजल्यावर लावलेल्या एका जाहिरातीत चक्क बँकॉकमधील फोटो वापरण्यात आला आहे. राज्यातील रस्त्यांची दुरवस्था पाहता, जाहिरातीमधील रस्ता महाराष्ट्रात कुठे दिसत नाही. त्यामुळे बँकॉकच महाराष्ट्रात आले आहे, असे सांगायला हे सरकार कमी करणार नाही, असा टोला सावंत यांनी लागवला.अमेरिकेतल्या रस्त्यापेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले आहेत, असा जावईशोध मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लावलाच आहे. भाजपाच्या नेत्यांना खोटं बोलण्याचा आजार जडला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सावंत म्हणाले.
महाराष्ट्रातही विकास वेडा झाला का? जाहिरातीत बँकॉकचा फोटो, काँग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:34 AM