मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर बेतलेल्या 'ठाकरे' चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्यात झालेल्या मानापमान नाट्यामुळे शिवसेना आणि मनसे आमने-सामने आले आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या मानापमान नाट्यानंतर अभिजित पानसे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. "लहान मेंदूत कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते'', ठाकरे चित्रपटामधून हाच संदेश देण्यात आला आहे, अशी चपराक संजय राऊत यांनी ट्विरवरून अभिजित पानसे यांना नाव न घेत लगावली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी 'ठाकरे' चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. वडाळ्यातल्या कार्निव्हल आयमॅक्समध्ये सुरू असलेल्या या स्क्रीनिंगला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सिनेमागृह फुल्ल झाले होते. अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अभिजित पानसेंसह कुटुंबीयांना स्क्रीनिंगला बसण्यासाठी पुढच्या रांगेत जागा आरक्षित करण्यात आली होती. परंतु एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मागच्या बाजूला जागा आरक्षित ठेवण्यात येते. मात्र सिनेमागृहात बसण्यासाठी मागच्या बाजूला जागा न मिळाल्यानं अभिजित पानसे प्रचंड संतापले. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊतांचं ऐकून न घेता 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगमधून अभिजीत पानसे कुटुंबीयांसह तडकाफडकी निघाले. त्यामुळे स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर चित्रपटापेक्षा या वादाचीच सुरुवात अधिक झाली.त्यानंतर संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी एक ट्विट करून अभिजित पानसे यांच्यावर नाव घेता निशाणा साधला. "लहान मेंदूत कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे'', असे राऊत यांना या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संजय राऊत यांच्याविरोधात सोशल मीडियावर मोहीमच उघडल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे नेते आणि 'ठाकरे'चे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मनसैनिक संजय राऊत यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे 'ठाकरे' मनसेसाठीच, राज ठाकरेंची प्रतिमा उंचावण्यासाठीच अधिक फायदेशीर ठरतो की काय, अशीही कुजबूज ऐकायला मिळत आहे.