Join us  

Maharashtra Kesari :महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखवर अन्याय झाला का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:57 PM

या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पै. सिकंदर शेख आणि पै. महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या मॅचमध्ये गुणांवरुन वाद सुरू आहे.

मुंबई- या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पै. सिकंदर शेख आणि पै. महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या मॅचमध्ये गुणांवरुन वाद सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी पै. सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे, तर काहींनी अन्याय झाला नसल्याचे म्हटले आहे, यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"महाराष्ट्र केसरी स्पर्धेत टांग कुणी कुणाला मारली यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. यामध्ये कधी कुणी अंगाला माती न लावलेले, कधीही न शड्डू ठाकलेले आघाडीवर होते. माझ मत आहे जे यात खेळ खेळतात, त्यांनीच यात बोलावे. आमच्या सारख्यांनी यात तोंडाची वाफ वाया घालवू नये, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. 

अपघात की घातपात? आमदार बच्चू कडूंनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

'फेसबुक, ट्विटर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर फक्त चर्चा सुरू होती. या चर्चेमुळे मल्लांनी केलेली दमदार कामगिरी झाकोळली गेली. असं माझ मत आहे. सिकंदरवरुन माध्यामात चर्चा सुरू आहेत, त्यात द्वेषाच राजकारण सुरू आहे, अशा पद्धतीने जातीय स्वरुप देऊ नये, कुस्तीला कुणीही बदनाम करु नका, अशी विनंतीही अजित पवार यांनी केली. 

'सर्व कुस्तीपटुंनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, या सर्व कुस्तीपटुंचे अजत पवार यांनी कौतुक केले. 

पै. सिकंदर शेखने दिली प्रतिक्रिया 

सिकंदर शेखने म्हटले, "जिथे टांग लागली तिथे परफेक्ट टांग लागली नव्हती, पण त्याची (महेंद्र गायकवाड) ॲक्शन होती म्हणून त्याला 2 गुण द्यायला पाहिजे होते. तसेच माझी पूर्णपणे पकड होती म्हणून मला 1 गुण द्यायला हवा होता. अशी 4-3 ने कुस्ती चालायला हवी होती. तिथे 2 गुण द्यायला हवे होते तिथे 4 गुण देण्यात आले. वरून पूर्णपणे खाली पडल्यावर 4 गुण दिले जातात पण तसे झाले नाही. माझ्या प्रशिक्षकांना दाद मागितली पण त्यांना तिथून हाकलून दिले. मी पूर्णपणे तयारी केली होती त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झालो असतो. पण तसे झाले नाही हे सर्व थांबले पाहिजे."