Join us

'त्या' पत्रावर सही होती की नाही? सुरज चव्हाण यांचा रोहित पवार यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 12:29 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि शरद पवार यांचा एक गट असे दोन गट पडले आहे. पक्षाच्या नाव आणि चिन्हासाठी आता दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात अर्ज दाखल केले आहेत. तर दुसरीकडे दोन्ही गटातील नेत्यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.आता अजित पवार यांच्या गटातील नेते सुरज चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप करत टोला लगावला आहे.

काल राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या गटाच्या एका कार्यक्रमात बोलताना सुरज चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांना टोला लगावला. अजित पवार भाजपसोबत जाण्याअगोदर राष्ट्रवादीतील आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी पत्रावर सह्या केल्या होत्या असा दावा केला होता. हाच मुद्दा पकडत सुरज चव्हाण यांनी पवार यांच्यावर टीका केली. 

सुरज चव्हाण म्हणाले, शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील ५३ आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी एका पत्रावर सह्या केल्या होत्या. या पत्रावर आमदार रोहित पवार यांनीही सही केली होती. त्यावेळी तुम्ही म्हणालात मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला भाजपसोबत जावावे लागेल आणि आता तुम्हाला नेता होण्याची संधी दिसायला लागल्यावर तुम्ही लगेच भूमिका बदलली.  महाराष्ट्राच्या जनतेला कळुद्या त्यावेळी तुमची विचारधारा कुठे गेली होती, असा टोला सुरज चव्हाण यांनी रोहित पवार यांना लगावला.  गेल्या काही दिवसापूर्वी आमदार सुनिल शेळके यांनीही रोहित पवार यांच्यायवर आरोप करत गौप्यस्फोट केले होते. आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत जाण्याचा विचार मांडला होता, असा गौप्यस्फोट आमदार शेळके यांनी केला होता, आता सुरज चव्हाण यांनीही आरोप केले आहेत. दुसरीकडे रोहित पवार यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत.  यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारअजित पवार