Join us

'मोदी सरकारचा दबाव होता का?'; कपिल देव निमंत्रणावरुन भडकली शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 11:39 AM

ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.

मुंबई - विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला. सलग १० सामने जिंकून अफलातून कामगिरी केलेल्या टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांचे विश्वविजयाचे स्वप्न भंगले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतिम सामना पाहण्याची लगबग होती. विशेष म्हणजे, अनेक दिग्गज माजी क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटीही मैदानात होते. मात्र, विश्वविजयाचा अंतिम सामना पाहण्यासाठी १९८३ च्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांना निमंत्रित न केल्याने वाद उपस्थित झाला आहे. आता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारचा दबाब असल्याचं म्हटलंय.

ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर, कलाकार, बॉलिवूड सेलिब्रिटी यांनी हजेरी लावली होती. मात्र, कपिल देव यांना आमंत्रण न दिल्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. याप्रकरणी काँग्रेसने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयवर टीका केली. त्यानंतर, आता शिवसेनेनंही मोदी सरकारचा दबाव असल्याचं म्हटलं आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. क्रिकेट विश्वातील आयकॉनचा हा निर्लज्जपणे केलेला अपमान आहे, हा भारताचा अपमान आहे. किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे?, असे म्हणत संजय राऊत यांनी बीसीसीय आणि आयसीसीवर निशाणा साधला. तसेच, भारतातील सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळेच तुम्ही असे केले का?, असा सवालही राऊत यांनी बीसीसीआय आणि आयसीसीला विचारला आहे. तर, संपूर्ण क्रिकेट जगतास आणि जगाला याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. 

काँग्रेसनेही BCCI वर साधला निशाणा

जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत बीसीसीयावर निशाणा साधला. कपिल देव यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी न बोलवणे चुकीचे आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. बीसीसीआयने त्यांना या सामन्यासाठी बोलवले नाही. विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होता. कपिल देव यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या महिला मल्लांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मनात जी गोष्ट असते ती कपिल देव करतात. त्यांनी महिला मल्लांना पाठिंबा दिल्यानेच त्यांना बोलवले गेले नाही का, अशी विचारणा जयराम रमेश यांनी केली आहे. 

कपिल देव यांची नाराजी उघड

२०२३ च्या फायनलसाठी बीसीसीआयने माझ्यासह ८३ च्या संघातील सर्वांना आमंत्रित करणे अपेक्षित होते पण त्यांनी कोणालाच बोलवले नाही, अशी खदखद कपिल देव यांनी व्यक्त केली. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितले की, मुलाखतीसाठी तुम्ही मला बोलावले आणि मी इथे आलो. पण बीसीसीआयने बोलावलेच नाही. खरे तर १९८३ चा संपूर्ण संघ तिथे बोलवायला हवा होता असे मला वाटते. पण, आता सर्वकाही वेगळे असून काही लोक मागील गोष्टी विसरत आहेत, या शब्दांत कपिल देव यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. 

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतकपिल देववन डे वर्ल्ड कप