भाजी नीट धूवा, शिजवा आणि मगच खा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:02 AM2021-03-30T04:02:12+5:302021-03-30T04:02:12+5:30

अजित लागू; याेग्य पद्धतीचा वापर केल्यास कीटकनाशकांचा परिणाम होतो कमी सचिन लुंगसे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजीत कीटकनाशके ...

Wash, cook and then eat vegetables! | भाजी नीट धूवा, शिजवा आणि मगच खा !

भाजी नीट धूवा, शिजवा आणि मगच खा !

Next

अजित लागू; याेग्य पद्धतीचा वापर केल्यास कीटकनाशकांचा परिणाम होतो कमी

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजीत कीटकनाशके असली तरी भाजी बनविण्याची आपली जी पद्धत आहे. त्यामुळे कीटकनाशकांचा नाश होतो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. भाजी नीट धुवून, नीट शिजवून आणि तेलाच्या सहाय्याने बनविली तर त्यातील कीटकेनाशके नष्ट होतात. त्यामुळे आपल्याला पुरवठा होत असलेली भाजी दूषित असली, रसायनमिश्रित असली किंवा त्यावर कीटकनाशकांचा प्रभाव असला तरी योग्य पद्धतीने भाजी बनविल्यास ती खाण्यासाठी योग्यच आहे, असा दावा नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशनचे (प्रोकॉम) उपाध्यक्ष अजित लागू यांनी केला.

* भाजीवर कीटकनाशके फवारणे योग्य आहे का; त्याचा परिणाम कसा होतो?

पिकांचे संरक्षण करण्याकरिता पिकांवर वेळेवर कीटकनाशकांची फवारणी करणे हा गुन्हा नाही. कारण तेव्हा पिकांवर आलेल्या किड्यांना मारण्यासाठी कीटकनाशके फवारणे गरजेचे असते. आता लोकांच्या डोक्यात एक गोष्ट बसली आहे, ती म्हणजे पिकांवर फवारण्यात आलेली कीटकनाशके पिकांवरच राहतात. मात्र, हे चूक आहे. कारण प्रत्येक कीटकनाशकाचे एक वर्तुळ असते. २१ दिवस ते राहते किंवा पिकांवरील कीड या काळात मारली जाते. त्यानंतर उष्णता आणि इतर कारणांमुळे ती नष्ट होते. त्यातला किंचित भाग तेथे राहतो. म्हणजे आपल्या ताटात भाजीसोबत कीटकनाशकांचा जो भाग येतो तो अत्यंत छोटा असतो. मात्र, शेतकऱ्यांनी क्षमतेपेक्षा अधिक कीटकनाशकांचा वापर केल्यास भाजीसाेबत कीटकनाशकांचा येणारा भाग जास्त असताे.

* मुंबईत येणारा भाजीपाला दूषित आहे का ?

जो भाजीपाला देशाबाहेर जाताे, त्याची आम्ही चाचणी करतो. येथे ही अट लागू असल्याने त्या भाजीची तपासणी करावी लागतेच. भारतीय खाद्यपदार्थ बनविताना ते अन्न शिजविले जाते. तेल वापरले जाते. यावेळी कीटकनाशकावर प्रक्रिया होते. म्हणजे धोका कमी होतो. परंतु जेव्हा आपण फळे किंवा भाज्या कच्च्या खातो तेव्हा मात्र ते आपल्या पोटात जाते. येथे थोडा धोका आहे. देशात सर्वत्र दूषित भाज्यांचा पुरवठा होतो. मात्र, आता हे प्रमाण कमी होत आहे. कारण अनेक ठिकाणी कीटकनाशक फवारणीवर आता बंदी घालण्यात येत आहे. प्रत्येक राज्यात म्हणजे महाराष्ट्रातही कीटकनाशकांचा वापर कमी होत आहे. मुंबईत जो भाजीपाला येतो त्यातले दूषित घटक मोजण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे. मात्र, बाहेर जाणारा भाजीपालाच तपासला जातो आणि दूषित घटक असलेला भाजीपाला आपल्याकडे विकला जातो.

* महापालिका किंवा सरकार यांची काही जबाबदारी आहे का?

दोन ते तीन दिवसांत भाजी खराब होते. आपल्याकडे काही खासगी प्रयोगशाळा सोडल्या तर राज्य किंवा मुंबई महापालिकेची भाजीपाला तपासण्याची वेगळी यंत्रणा नाही. मात्र, आपण भाजीपाला व्यवस्थित शिजवून खाल्ला तर त्रास होत नाही. त्या पौष्टिक लागतात.

* दूषित भाजी खाल्ल्याने कोणाचा मृत्यू झाला आहे का?

कीटकनाशक हे विष आहे. त्याचा परिणाम माणसावरही होतो. पण, दूषित भाजीमुळे कोणाचा मृत्यू झाला; असे अजून तरी माझ्या ऐकिवात नाही. त्याचे परिणाम हळूहळू होतात. देशांतर्गत भाज्यांची तपासणी होत नाही किंवा तशी यंत्रणा नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना आणि अशा प्रकाराच्या भाजीचा एकमेकांशी सबंध जोडू नये. उपाय म्हणजे भाजी नीट धुवून घ्या. असे केल्याने कीटकनाशक किंवा रसायन धुवून जाईल. भाजी नीट शिजवून खा. कच्ची खाऊ नका.

....................

Web Title: Wash, cook and then eat vegetables!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.