रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जेईई-मेनच्या पहिल्या सत्राबरोबरच दुसऱया सत्रातही वाशिमच्या नीलकृष्ण गजरे याने १०० पर्सेंटाईल मिळवत अव्वल कामगिरी केली आहे. देशभरातून ५६ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत. यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थी आहेत.
नीलकृष्णचे वडिल शेतकरी आहेत. त्याच्या कोचिंगसाठी तेही नागपूरला त्याच्यासोबत राहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे जानेवारीत झालेल्या जेईई-मेनच्या पहिल्या सत्रातही नीलकृष्णने १०० पर्सेंटाईल मिळविले होते. जेईई-मेन वर्षातून दोन वेळा घेतली जाते.
दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला नीलकृष्ण आता जेईई-अॅडव्हान्सच्या तयारीला लागला आहे. मुंबई आयआयटीत कम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळविणे हे त्याचे ध्येय्य आहे.
अकरावीला त्याने जेईईच्या तयारीला सुरूवात केली. दहावीच्या तुलनेत अभ्यासाचा व्याप खूप वाढला होता. त्यामुळे सुरवातीला दडपण आले. परंतु, आपण प्रयत्न सोडले नाहीत. असे दडपण आले तरी आपली अभ्यासाची तयारी सोडायची नाही, असा सल्ला त्याने विद्यार्थ्यांना दिला आहे.
नवी मुंबईतील दक्षेश मिश्रा याने देशभरातून दुसरा रँक मिळवला आहे. तर हरियाणाचा आरव भट हा विद्यार्थी देशातून तिसऱया क्रमांकावर आहे. मुलींमधून कर्नाटकाची सानवी जैन आणि दिल्लीची शायना सिन्हा यांनी १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत.
मुंबईतील आर्यन प्रकाश यानेही दुसऱ्यांदा १०० पर्सेंटाईल मिळवण्याची कामगिरी केली आहे. अंधेरी येथे राहणाऱया आर्यनचे आई-वडील आयकर अधिकारी आहेत. परंतु त्याला भौतिकशास्त्र आणि गणिताची आवड आहे.
दोन हजार विद्यार्थ्यांचे निकाल रोखले
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरले आहेत. सत्र एक आणि दोन अशा दोन्ही परीक्षा देताना ज्यांनी नवीन नोंदणी क्रमांक तयार केले, त्यांचे निकाल रोखून धरण्यात आले आहेत. एनटीए या विद्यार्थ्यांशी ईमेद्वारे संपर्क साधणार आहे. दोन नोंदणी क्रमांक एकाच विद्यार्थ्याचे असल्याची खात्री केल्यानंतर त्यांचे निकाल जाहीर केले जातील. दरम्यान विश्वासभंग केल्यामुळे १३ विद्यार्थ्यांना जेईई मेन घेण्यापासून कायमचे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
पहिल्या सत्राला बसलेले विद्यार्थी - ११,७०,०४८
दुसऱया सत्राला बसलेले विद्यार्थी - १०,६७,७५९
दोन्ही सत्राला बसलेले विद्यार्थी - ८,२२,८९९