भांडुपच्या गँगस्टरची मुलुंडमध्ये धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:23 AM2018-03-29T02:23:26+5:302018-03-29T02:23:26+5:30
मुलुंडच्या बांधकाम साईटवर काम मिळाले नाही म्हणून सुरू असलेले काम बंद करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या गँगस्टर अमित भोगलेसह त्याच्या साथीदारांची मुलुंड पोलिसांनी धुलाई केल्याचा प्रकार सोमवारी घडला.
मुंबई : मुलुंडच्या बांधकाम साईटवर काम मिळाले नाही म्हणून सुरू असलेले काम बंद करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या गँगस्टर अमित भोगलेसह त्याच्या साथीदारांची मुलुंड पोलिसांनी धुलाई केल्याचा प्रकार सोमवारी घडला.
मुलुंड एलबीएस मार्गावर सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर खड्डा खणण्याचे काम भोगलेला मिळणार होते. अमितपासून वेगळा झालेला आदित्य क्षीरसागर उर्फ शिऱ्या आणि मयूर शिंदेपासून वेगळा झालेला सागर जाधव यांनी हे काम मिळविले. ही बाब भोगलेला समजताच तो ५० ते ६० साथीदारांसह सोमवारी बांधकाम साईटवर पोहोचला आणि तेथील काम बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला. विकासकाकडून ही माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे हे त्यांच्या दोन पोलीस निरीक्षक, पोलीस पथकाच्या ४ गाड्या घेऊन घटनास्थळी पोहोचले. तेथे भोगले टोळीकडून पोलिसांना दमदाटी, धक्काबुक्की केल्याने काळे यांच्यासह त्यांच्या पथकाने भोगलेसह त्याच्या साथीदारांची धुलाई केली. तेथून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि तेथेही त्यांना चांगलाच चोप दिला.
हत्याकांडाने गाजत असलेल्या भांडुपची पार्श्वभूमी लक्षात घेता, भांडुप पोलिसांना जे जमले नाही ते मुलुंड पोलिसांनी करून दाखवले.
पोलिसांनी घेतले रेकॉर्डवर
मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसला, तरी भोगलेसह त्याचे साथीदार नौशाद, राम साळवी, अमीन, सैफ अली, अजीज, जुबेर, विनय, लतीफ, मुख्तार, विनोद, प्रफुल्ल, मोहम्मद जायद, मो. रियाज, स्वप्निल, जगदीश, भावेश, इस्माईल, तुषार यांचे फोटो रेकॉर्डसाठी काढून घेतले आहेत.
ठाण्याच्या वजनदार आमदाराच्या कॉलमुळे कारवाईला रोख
या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार होती. मात्र ठाण्यातील राष्ट्रवादीच्या वजनदार आमदाराचा फोन आल्यामुळे कारवाई थांबविण्यात आली.