मुंबई : वरळी, धारावी आणि पश्चिम उपनगरातील कोरोनासह आता मुंबईतील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला असतानाच अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टनेदेखील मुंबई महापालिकेच्या कोरोना कामगिरीची दखल घेतली आहे. मुंबईमधील कोरोनाचे रुग्ण, बरे रुग्ण आणि मृत्यू याबाबतचे आकडे पारदर्शक असून, मुंबई महापालिकेचे काम परिणामकारक आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. या स्वयंशिस्तीची आणि एकात्मिक प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देताना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. हे कौतुक होत असतानाच आता वॉशिंग्टन पोस्टनेदेखील मुंबई महापालिकेच्या कामगिरीची दखल घेतली आहे.
मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिका परिणामकारक काम करत आहे. येथील संसर्ग, रुग्ण, मृत्यू याबाबतची आकडेवारी पारदर्शक आहे. यात कोणतीही लपवाछपवी केली जात नाही, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. वॉशिंग्टन पोस्टने भारतातील कोरोना मृत्यूच्या आकडेवारीबाबत लपवाछपवी होत नसल्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथील मृत्यूबाबतची आकडेवारी मागविण्यात आली होती. याबाबत मुंबई महापालिकेने सर्व अद्ययावत माहिती सादर केली, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.चेस द व्हायरस आणि ट्रेसिंग-ट्रॅकिंग- टेस्ंिटग-ट्रिटिंगची चतु:सूत्री
इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपाययोजना अव्याहतपणे राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने चेस द व्हायरस आणि ट्रेसिंग - ट्रॅकिंग - टेस्टिंग - ट्रिटिंगची चतु:सूत्री या उपाययोजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तींचे अलगीकरण करणे, आवश्यकतेनुरूप संशयितांच्या व बाधितांच्या कोरोनाविषयक वैद्यकीय चाचण्या करणे आणि लक्षणे असलेल्या बाधितांवर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार औषधोपचार करणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.
वैद्यकीय चाचण्या करताना त्याबाबतचा अहवाल २४ तासांच्या आत महापालिकेकडे प्राप्त होईल आणि त्यानंतर महापालिकेच्या स्तरावर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार अधिकाधिक प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. अभियान पद्धतीने विलगीकरण व आवश्यकतेनुसार औषधोपचार केले जात आहेत.
खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोविडविषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय इकबाल सिंह चहल यांनी नुकताच घेतला होता. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबईत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यापूर्वीच केला असून, त्यानुसार कोविड संक्रमणाचे प्राबल्य समजून घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे.
चेस द व्हायरस हे सूत्र घेऊन फिव्हर क्लिनिक्सच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधून रुग्णांचा शोध घेतला गेला; त्याच धर्तीवर पावसाळी आजारांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहकार्याने महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रामुख्याने शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशी वैद्यकीय शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश इकबाल सिंह चहल यांनी दिले होते.
कोविडने बाधा झालेल्या व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याविषयीची आकडेवारी व तपशील हा मृत्यू झाल्यापासून ४८ तासांच्या आत व निर्धारित नमुन्यात इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश इकबाल सिंह चहल यांनी दिले होते.