मुंबई : ओला व सुका कचरा प्रकल्पात स्थानिक कार्यकर्त्यांनी (अॅडव्हान्स लोक्यालिटी मॅनेजमेंट-एएलएम) सहकार्य न केल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचा पवित्रा पालिकेने घेतला आहे़ प्रशासनाच्या या फतव्यामुळे वॉर्डातील एएलएम यांनी याविरोधात बंड पुकारले आहे़ यामुळे आधीच रखडलेल्या ओला व सुका कचरा वर्गीकरण प्रकल्पास याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत़मुंबईत कचऱ्याची समस्या वाढत असल्याने पालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरण मोहीम हाती घेतली आहे़ मात्र अनेक वर्षे उलटूनही या प्रकल्पात पालिकेला यश आलेले नाही़ त्यामुळे प्रत्येक निवासी सोसायटीपर्यंत पोहोचून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी स्थानिक एएलएम यांची मदत घेण्यात येत होती़ मात्र अचानक पालिकेने परिपत्रक काढून यात सहकार्य न करणाऱ्या एएलएमची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला आहे़कचरा वर्गीकरणामध्ये सहकार्य करणाऱ्या एएलएमलाच दर महिन्याच्या बैठकीला हजर राहता येईल, असेही नमूद करण्यात आले आहे़ मात्र अशा प्रकारचा फतवा म्हणजे या कार्यकर्त्यांवर सूड उगविण्यासारखेच असल्याचा सूर एएलएम यांनी लावला आहे़ याविरोधात चार नागरी संघटनेच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांची भेट घेऊन या परिपत्रकाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़
कचरा वर्गीकरण प्रकल्प रेंगाळणार ?
By admin | Published: February 10, 2015 12:20 AM