Join us

‘आऊटफॉल’मध्ये कचरा; रेल्वे रुळांवर साचले पाणी; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 11:45 AM

गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील सखल भागांसह चर्चगेट ते मरिन लाइन्सदरम्यान रेल्वे रुळांवर पावसाचे पाणी काही प्रमाणात साचले.

मुंबई : गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील सखल भागांसह चर्चगेट ते मरिन लाइन्सदरम्यान रेल्वे रुळांवर पावसाचे पाणी काही प्रमाणात साचले. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या राडारोड्यामुळे पाणी रुळांवर आल्याच्या चर्चा आणि व्हिडीओ व्हायरल झाले. मरिन लाईन्स येथील पाटण जैन मार्गाच्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या आऊटफॉलमध्ये (पातमुखात) अनेक छोटे-मोठे दगड अडकल्यामुळे पाणी रेल्वे रुळांवर आल्याची माहिती मुंबई पालिकेच्या ए विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  विभागातील पर्जन्य जलवाहिन्या अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून हे आऊटफॉल मोकळे केल्याची माहितीही दिली. त्यामुळे चर्चगेट व मरिन लाईन्सदरम्यान  रुळांवरील पाण्याचा निचरा झाला.

समुद्राच्या लाटांबरोबर वाहून येणारा गाळ, रेती, लहान दगड या पर्जन्य जलवाहिनीच्या आऊटफॉलमध्ये अडकल्याचे दिसून आले. अधिक क्षमतेचे पंप लावून पाण्याचा पूर्णपणे निचरादेखील केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

पालिकेकडून दक्षता

 रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्याचा व्हिडीओ व्हायरल होताना महापालिकेकडून कोस्टल रोडचे  काम सुरू आहे, त्याच्या राडारोड्यामुळे हे पाणी पोहचल्याचा संदेशही व्हायरल झाला.  मुंबईकरांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.  कोस्टल रोड प्रकल्प बांधकाम परिसरातील सर्व आऊटफॉल मोकळे राहतील, याची दक्षता प्रकल्पाचे बांधकाम सुरू असल्यापासून सर्वत्र घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.