शेफाली परब-पंडित मुंबई : ओल्या कच-यावर प्रक्रियेची गृहनिर्माण सोसायट्यांना सक्ती करून डम्पिंग ग्राउंडवरील भार कमी करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. त्याचवेळी कच-यापासून वीजनिर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मात्र फसला आहे. फेरनिविदेची मुदत संपूनही कोणतीच कंपनी पुढे येत नसल्याने हा प्रकल्प अडचणीत आला आहे. त्यामुळे ही मुदत आता २५ आॅक्टोबरपर्यंत वाढवून अनुभवी, इच्छुक कंपनीचा शोध सुरू आहे.मुंबईत दररोज तयार होणारा कचरा गेली अनेक वर्षे देवनार व मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर पाठविण्यात येतो. त्यामुळे देवनार डम्पिंग ग्राउंडवर ३५ मीटर्सपर्यंत कचºयाचा टॉवर उभा राहिला आहे. तसेच या डम्पिंग ग्राउंडची क्षमताही संपुष्टात आली आहे. परिणामी, लवकरच या डम्पिंग ग्राउंडला टाळे लावण्याची वेळ आली आहे. यावर उपाय म्हणून २०१४मध्ये वीजनिर्मिती प्रकल्प महापालिकेने हाती घेतला. त्यानुसार तीन हजार मेट्रिक टन कचºयातून २५ मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे.अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याने आॅनलाइन निविदा प्रक्रियेबद्दल माहिती देण्यासाठी ठेकेदारांची कार्यशाळाही ठेवण्यात आली होती. या प्रकल्पााचे सर्वत्र स्वागतही झाले. या निविदेची मुदत २८ सप्टेंबर रोजी संपली. तरी निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास कोणीही पुढे न आल्याने निविदेची मुदत २५ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
कच-यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला वाली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:06 AM