मुंबई :उत्तरपत्रिका हरवल्याने विद्यार्थिनीला फक्त १७ गुण देणा-या विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. मीनाक्षी पाटील या विद्यार्थिनीला बीएच्या ‘अॅडव्हान्स इकॉनॉमिक्स थिअरी’ या विषयात कमी गुण मिळाल्याने तिचे एक वर्ष वाया गेले आहे. पूर्ण उत्तरपत्रिका तपासली नसल्यानेच तिचे वर्ष वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे.मीनाक्षीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तीर्ण असल्याची खात्री असल्याने, गेल्या तीन महिन्यांपासून पूनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीसाठी ती परीक्षा मंडळाचे उंबरठे झिजवत होती. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने युवासेनेकडे मदत मागितली. त्या वेळी छायांकित प्रती मिळवून देण्यासाठी युवासेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी परीक्षा मंडळाला भेट दिली. त्या वेळी हाती आलेल्या छायांकित प्रतीमध्ये मूळ उत्तरपत्रिकाच गायब असून, केवळ पुरवणीमध्ये दोनच गुण असल्याचे समोर आले. त्यानंतर, अधिक शोधाशोध केल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका सापडली. मात्र, त्यातील काही प्रश्न न तपासताच परीक्षा मंडळाने १७ गुण दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. आता विद्यापीठाने ही उत्तरपत्रिका पूनर्मूल्यांकनासाठी पाठविली आहे.या संपूर्ण गोंधळात मीनाक्षीला बीएडची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असूनही केवळ निकालाच्या गोंधळामुळे प्रवेशाला मुकावे लागले. पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निकालाच्या गोंधळाचा एकाही विद्यार्थ्याला फटका बसणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे मीनाक्षीच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल युवासेनेच्या साईनाथ दुर्गे यांनी उपस्थित केला आहे.
निकालाच्या गोंधळाने विद्यार्थिनीचे वर्ष वाया! पूर्ण उत्तरपत्रिका तपासली नसल्यानेच स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:41 AM