मुंबई : गॅ्रण्टरोड पूर्वेकडील डॉ. दादासाहेब भडकमकर मार्गावरील बाळगोविंद चाळीतील घरांमध्ये गटाराचे सांडपाणी तुंबल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. मेट्रो-३च्या प्रकल्पामुळे गटारे तुंबल्याने रहिवाशांच्या घरात सांडपाणी शिरत आहे. या चाळीमध्ये ३० घरे असून चार घरांमधील बाथरूममध्ये सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचते. तसेच या सांडपाण्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली.चाळीच्या पाठीमागचे गटार गेले कित्येक महिने साफ केलेले नाही. परिणामी, मेट्रो-३च्या कामातून निघणारा चिखल हा गटारात जमा झाल्याने सांडपाणी गटारात तुंबते. त्यामुळे गटारातून पाणी वाहून न जाता रहिवाशांच्या घरातील बाथरूममध्ये जमा होते.सुहास भुजबळ, गणपत कावळे, राजाराम सावंत आणि सायली सावंत यांच्या घरांमध्ये पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाणी तुंबून राहते. सांडपाण्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सांडपाण्यामुळे घरात दुर्गंधी पसरली आहे आणि लहान मुलांची प्रकृती खालावत आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली.बाथरूममध्ये सकाळी अंघोळ किंवा इतर कामे करायला मिळत नाही. सांडपाण्यामुळे घरातील सर्व सदस्य आजारी पडत आहेत. गटार दुरुस्ती कामासाठीचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरुवात केली जाईल, असे स्थानिक लोकप्रतिनिधी सांगतो, अशी माहिती रहिवासी सुहास भुजबळ यांनी दिली.यासंदर्भात रहिवासी गणपत कावळे म्हणाले, सांडपाणी घरात साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे घरातले सदस्य आजारी पडत आहेत. दरम्यान, चाळीतील रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माजी आमदार रवींद्र नेरकर आणि शाखाप्रमुख शशिकांत पवार हे संबंधितांना मदत करत आहेत. यांच्या मदतीने सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसविण्यात आला आहे. मात्र, ही तात्पुरती सोय असल्यामुळे या समस्येतून कायम सुटका करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.>सांडपाण्याच्या समस्येबाबत रहिवाशांनी पत्र लिहून द्यावे. हे पत्र महापालिकेत पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल.- मीनल पटेल,स्थानिक नगरसेविका>मेट्रो प्राधिकरणाचा संबंध नाहीयेथील गटाराजवळ मेट्रोचे काम सुरू नाही, तर त्याच्या विरुद्ध दिशेला काम सुरू आहे. त्यामुळे या समस्येबाबत मेट्रो-३चा काही संबंध नाही. महापालिकेला मेट्रो प्राधिकरणांतर्गत पुरेपूर सहकार्य करीत आहोत.तसेच कंत्राटदाराने तिथे पंप बसविलेला आहे. नेहमी साईडची साफसफाई केली जाते, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.
सांडपाणी रहिवाशांच्या घरात, दुर्गंधी, रोगांचा प्रसार, बाळगोविंद चाळीतील रहिवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:28 AM