पवई तलावात सांडपाणी
By admin | Published: June 2, 2016 01:50 AM2016-06-02T01:50:12+5:302016-06-02T01:50:12+5:30
सांडपाणी थेट पवई तलावात सोडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पवई तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावाच्या सौंदर्यांसोबतच येथील जलचर प्राणी
मुंबई : सांडपाणी थेट पवई तलावात सोडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पवई तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावाच्या सौंदर्यांसोबतच येथील जलचर प्राणी, वनस्पती आणि पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून याची तक्रार ‘एस’ विभागाच्या आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पवई तलावालगतच्या रहिवासी संकुलातील सांडपाणी थेट तलावात सोडल्यामुळे पवई तलाव अस्वच्छ झाला आहे. पाण्यावर प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलचा थर साचलेला दिसत आहे.
तलावात सोडल्या जाणाऱ्या या सांडपाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून याचा थेट परिणाम तलावातील जलचर प्राण्यांवर होत असल्याचे ‘प्लांट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी’च्या निदर्शनास आले आहे. काही वर्षांपूर्वी या तलावात मगरी आढळल्या होत्या. पण सद्य:स्थितीत मगरींचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती अॅनिमल वेल्फेअर सोसायटीकडून देण्यात आली. पवई तलाव सुशोभीकरणाच्या प्रक्रियेमुळे तलावाचे सौंदर्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्यात हस्तक्षेप झाला होता. पण आता सांडपाण्यामुळे नैसर्गिक सौंदर्यासोबत येथील वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांना हानी पोहोचते आहे. सांडपाण्याचे नियोजन करून तलावाला पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ द्यावा, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.