चेंबूरमध्ये रस्त्यावर सांडपाणी
By admin | Published: January 3, 2015 01:01 AM2015-01-03T01:01:33+5:302015-01-03T01:01:33+5:30
एकीकडे रस्त्यांची कामे सुरू असताना त्यात गटारांमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र सध्या चेंबूरच्या आर. सी. मार्गावर पाहायला मिळत आहे.
चेंबूर : एकीकडे रस्त्यांची कामे सुरू असताना त्यात गटारांमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र सध्या चेंबूरच्या आर. सी. मार्गावर पाहायला मिळत आहे. पालिका या सर्वांकडे कानाडोळा करीत असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, पालिकेने तत्काळ यावर तोडगा काढावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
गेल्या ५ वर्षांपासून चेंबूरच्या आर. सी. मार्गावर मोनो रेल्वेचे काम सुरू आहे. सध्या मोनो प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन मोनो लोकांच्या सेवेत हजर झाली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून या मार्गावर असलेली वाहतूककोंडीची समस्या सध्या आहे त्याच स्थितीमध्ये आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी तत्काळ मोनो रेल्वे सुरु करावी, अशी मागणी केली. त्यानुसार एमएमआरडीएने मोनो सुरू केली. मात्र येथील वाहतूककोंडीचा प्रश्न देखील जैसेथे आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या या वाहतूककोंडीमुळे रहिवाशांसह वाहनचालक देखील हैराण झाले होते. खड्ड्यांमुळे वाहनांच्या खर्चात वाढ होत होती. त्यामुळे या मार्गावरून माहूल गाव, वाशी नाका आणि गडकरी खाण या ठिकाणी जाण्यास रिक्षा आणि टॅक्सीचालक नकार देत होते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना बेस्ट बस हा एकमेव पर्याय होता. मात्र चेंबूर आणि कुर्ला रेल्वे स्थानकावरून माहूल किंवा वाशीनाका हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटांचे असताना येथे पोचण्यास पाऊण ते एक तासाचा वेळ लागत आहे. हा त्रास काहीसा कमी व्हावा, यासाठी अनेक पक्षांनी आंदोलने केल्यानंतर तीन महिन्यांपासून या मार्गावरील खराब झालेले रस्ते पुन्हा नव्याने तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
एकीकडे नव्याने तयार होत असलेले रस्ते आणि दुसरीकडे पालिकेच्या मलनि:स्सारण वाहिनीचे काम याच मार्गावर सुरू आहे. त्यामुळे सध्या या मार्गावर रोज एकतरी पाण्याची पाइपलाइन फुटण्याची घटना घडत आहे. तसेच जमिनीखालून टाकण्यात येणाऱ्या मलनि:स्सारण पाइपमुळे मोठ्या प्रमाणात खोदकामही सुरू आहे. त्यामुळे जमिनीखालून निघणारे घाण पाणी रस्त्यालगत असलेल्या गटारांमध्ये सोडण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
च्या सांडपाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती देखील असल्याने सध्या या परिसरातील गटारे मातीने तुंबली आहेत. परिणामी गटारांमधील सांडपाणी हे रस्त्यावर वाहत असल्याने पादचाऱ्यांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
च्पालिकेने तत्काळ ही समस्या न सोडवल्यास पालिकेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे शाखा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिला आहे.