वाडा गावात भीषण पाणी टंचाई
By admin | Published: April 13, 2015 10:41 PM2015-04-13T22:41:09+5:302015-04-13T22:41:09+5:30
वाड्यातील रहिवासी पाणी समस्याने त्रस्त झाले असून शिवाजी नगरात वाडा ग्रामपंचायतीकडून गेल्या कित्येक वर्षांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
वाडा : वाड्यातील रहिवासी पाणी समस्याने त्रस्त झाले असून शिवाजी नगरात वाडा ग्रामपंचायतीकडून गेल्या कित्येक वर्षांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तर राज्याचे आदिवासी विकास मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या उत्कर्ष नगरातही तीव्र पाणीटंचाई सुरु झाली आहे. अतीटंचाई भागातील नागरिकांनी एप्रिलपासूनच एक दिवसा आड अंघोळीचा पर्याय निवडला आहे.
वाडा शहराची लोकसंख्या ४० हजाराहून अधिक असून दिवसेंदिवस वाढतच आहे. शहराला प्रामुख्याने वैतरणा नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. या साठ्यातून वाड्यातील इतर नगरांना पाणीपुरवठा सुरळीत होतो. मात्र शिवाजीनगर, शास्त्रीनगर, विष्णूनगर, उत्कर्षनगर, विवेकनगर, समर्थ नगर या नगरातील नागरीकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील नागरीकांना बैलगाडीने, टँकरने पाणी विकत घ्यावे
लागत आहे.
या संदर्भात या नगरातील ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील यांनी सांगितले की, वाडा शहराची वस्ती वाढल्याने नगरांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यास पाईपलाईन अपुऱ्या पडत आहेत. परंतु या तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान वाडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी ए.जी. इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता ज्या-ज्या नगरांना पाणी टंचाई आहे. त्यांची आम्ही माहिती घेतली असून टंचाईग्रस्त नगरांना लवकरच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)
व्यथा आणि कथा
ग्रामपंचायतीला वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही ग्रामपंचायतीने नेहमीच तांत्रिक कारण दाखवून दोष दूर करू व लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी आश्वासने दिली. मात्र त्याची पूर्तता केली नसल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाल्याचे शिवाजीनगर येथील रहिवासी दामोदर पाटील यांनी सांगितले. तसेच पाणी टंचाईमुळे येथील नागरिकांनी आंघोळीला रामराम ठोकला आहे. तर आजूबाजूच्या खेड्यातून नोकरीनिमित्त वाड्यात राहायला आलेल्या रहिवाशांनी वाड्यातील घरे सोडून गावाकडे मुक्कमा ठोकायला सुरुवात केली आहे.