पश्चिम रेल्वेवर मोठा अनर्थ टळला...
By admin | Published: September 16, 2015 01:33 AM2015-09-16T01:33:20+5:302015-09-16T01:33:20+5:30
जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरल्याची घटना अंधेरी ते विलेपार्लेदरम्यान घडली आणि एकच धावपळ रेल्वे प्रशासनाची उडाली. मात्र झालेल्या अपघातापेक्षाही मोठा
मुंबई : जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरल्याची घटना अंधेरी ते विलेपार्लेदरम्यान घडली आणि एकच धावपळ रेल्वे प्रशासनाची उडाली. मात्र झालेल्या अपघातापेक्षाही मोठा अपघात याच घटनास्थळी झाला असता आणि त्याची तीव्रता अधिक असती, अशी बाब समोर आली आहे.
अपघातग्रस्त लोकलच्या बाजूच्या ट्रॅकवरूनच बोरीवलीला जाणारी जलद लोकल येत होती. मात्र अपघात होताच बोरीवली जलद लोकलच्या मोटरमने प्रसंगावधान दाखवून लोकल थांबविली अन्यथा अपघातग्रस्त लोकलचे डबेही याच लोकलवर आदळून मोठा अपघात झाला असता.
विरारहून चर्चगेटला जाणारी जलद लोकल अंधेरी ते विलेपार्लेदरम्यान सकाळी अकराच्या सुमारास येताच लोकलचे सात डबे रुळावरून घसरले. हे डबे घसरताच यातील दोन डबे तर विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलच्या ट्रॅकवर कलले. त्यामुळे डाऊनला जाणारी लोकल सेवाही ठप्प झाली. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी लोकलमधून उड्याही मारल्या. याबाबत रेल्वेतील सूत्रांनी सांगितले की या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
लोकप्रतिनिधींची पाठ : मंगळवारी पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलचे सात डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्तापाला सामोरे जावे लागले असतानाच लोकप्रतिनिधीं मात्र प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे पाठच फिरवल्याचे दिसले. पश्चिम रेल्वेवरील अपघातग्रस्त ठिकाणी कोणत्याही खासदार किंवा आमदाराने भेट देऊन अपघाताची माहितीही घेतली नाही. तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी फक्त मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांकडून घटनांची माहिती घेत सुरक्षेचे उपाय करण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ब्लॉकनंतरच घटना
मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावर प्रत्येक रविवारी अनेक विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. मेगाब्लॉक घेतल्यानंतरच तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत असल्याने मेगाब्लॉकचा फायदा काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
सप्टेंबर २0१४ : डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरला. लोकल दिवसभर विस्कळीत
जून २0१५ : पश्चिम रेल्वेवर चर्चगेट येथे बफरवर लोकल आदळली. यात पाच प्रवासी जखमी झाले. पश्चिम रेल्वे दोन दिवस विस्कळीत.
सप्टेंबर २0१५ : सीएसटी येथे हार्बरवर सायंकाळी लोकलचा एक डबा घसरला. हार्बर विस्कळीत.
सप्टेंबर २0१५ : अंधेरी ते विलेपार्लेदरम्यान लोकलचे सात डबे रुळावरून घसरले. सहा प्रवासी जखमी.