Join us

नालेसफाईवर ‘सीसीटीव्ही’चा वॉच

By admin | Published: December 17, 2015 2:37 AM

मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाईच्या घोटाळ्यावरून महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा रंगला असताना, आता नालेसफाईच्या कामावर लक्ष

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाईच्या घोटाळ्यावरून महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा रंगला असताना, आता नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी संबधित ठिकाणी सीसीटिव्ही बसविण्यात यावेत, अशी उपसूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली. विशेष म्हणजे, या उपसूचनेला नालेसफाईच्या प्रस्तावासह मंजुरीदेखील मिळाल्याने भविष्यात होणाऱ्या नालेसफाईवर आता ‘सीसीटीव्ही’चा वॉच असणार आहे.बुधवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मलनिस्सारण व नालेसफाईचा प्रस्ताव दाखल झाला. या प्रस्तावावर सदस्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी नालेसफाईच्या कामावर पाहणीसाठी सीसीटीव्हीचा वापर करण्यात यावा, अशा आशयाची उपसूचना मांडली. बैठकीतील उर्वरित सदस्यांनीही मनसेच्या या उपसूचनेला पाठिंबा दर्शविला. शिवाय नालेसफाईच्या कामांचे चित्रीकरण करण्याऐवजी, संबधित ठिकाणी सीसीटीव्ही बसवले, तर निश्चितच आवश्यक माहिती उपलब्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे या कामी दिशाभूल होणार नाही, असे म्हणणे मांडले. मनसेकडून दाखल झालेली ही उपसूचना स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रस्तावासह मंजूर करून घेतली. (प्रतिनिधी)पारदर्शकता येणार का ?- नालेसफाईच्या घोटाळ्याने महापालिकेतील राजकारण चव्हाट्यावर आले आहे. शिवाय घोटाळ्यातील कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. आता तर भविष्यात नालेसफाईच्या कामावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार असल्याने नालेसफाईची कामे किती पारदर्शक होतात? याकडे तमाम मुंबईकरांचेही लक्ष राहणार आहे.