मुंबई : कचरा व नालेसफाईचा गाळ वाहून नेणाºया ठेकेदारांचा घोटाळा उघड झाल्यानंतर, अशी हातसफाई रोखण्यासाठी अखेर महापालिकेने पावले उचलली आहेत़ त्यानुसार, या वाहनांचा मार्ग, ती ठरलेल्या ठिकाणीच जात आहेत का? तसेच त्या वाहनांच्या फेºया ठरलेल्या संख्येनुसारच होत आहेत का? याची खातरजमा करण्यासाठी या सर्व वाहनांमध्ये ‘व्हीटीएमएस’ (व्हेइकल ट्रॅकिंग मॉनिटरिंग सीस्टम) उपकरण बसविणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे.
पिण्याचे पाणी वाहून नेण्यासाठी असणारे पालिकेचे टँकर, घनकचरा वाहून नेणारे कॉम्पॅक्टर्स, इमारतींच्या विकास प्रक्रियेदरम्यान तयार होणारे डेब्रिज किंवा नालेसफाईतील गाळ वाहून नेणारी वाहने, यांसारख्या वाहनांचा वापर महापालिका नागरी सुविधा पुरविण्यासाठी करीत असते़ मात्र, कचरा वाहून नेणाºया गाड्यांमध्ये डेब्रिज टाकून त्याचे वजन ठेकेदार वाढवित असल्याचे उजेडात आले होते़ तसेच नालेसफाईच्या कामातही गाळ वाहून नेताना असाच भ्रष्टाचार झाला होता़ त्यामुळे ठेकेदारांची हातचलाखी रोखण्यासाठी पालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत़
या सर्व वाहनांचे मार्ग व फेºयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापूर्वी स्वतंत्र ‘मध्यवर्ती नियंत्रण कक्ष’ नव्हता. त्यामुळे स्वतंत्र नियंत्रण कक्ष आता सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘व्हीटीएमएस’ उपकरण असलेली वाहने आपल्या निर्धारित जागी व निर्धारित मार्गानुसारच जात असल्याचे ‘जीपीएस’च्या आधारे कळू शकणार आहे़ ग्रँट रोड येथील पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या कार्यालयात हा नियंत्रण कक्ष लवकरच उभारण्यात येणार आहे़
...असे होणार नियंत्रणपाणी वाहून नेणारे २८ टँकर्स, जलअभियंता खात्याच्या अखत्यारितील इतर ३२४ वाहने, डेब्रिज वाहून नेण्यासाठी उपयोगात येणारी सुमारे चार हजार वाहने, घनकचरा वाहून नेणारी दोन हजार ६२८ वाहने, नालेसफाईचा गाळ वाहून नेणारी ७७१ वाहने, मलनिस्सारण प्रचालने खात्याच्या कामांशी संबंधित ६० वाहने, अशी सुमारे सात हजार ८११ वाहनांमध्ये ‘व्हीटीएमएस’ उपकरण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापैकी घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अनेक वाहनांसह पालिकेच्या इतरही वाहनांमध्ये ‘व्हीटीएमएस’ उपकरण यापूर्वीच बसविण्यात आले आहे.
नियंत्रण कक्षाचा २४ तास वॉचया वाहनांवर नियंत्रणासाठी बसविलेल्या ‘व्हीटीएमएस’ उपकरणाच्या माध्यमातून हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत असणार आहे़ या कक्षामुळे डेब्रिज, कचºयाची किंवा पिण्याच्या पाण्याची वाहतूक ही योग्य प्रकारे व निर्धारित जागीच होत असल्याची खातरजमा करता येणार आहे. त्यामुळे पारदर्शकता जपण्यासहप्रभावी संनियंत्रण करणे साध्य होईल, असा दावा घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी केला आहे़