आरेत बिबट्यापासून संरक्षणासाठी वन खात्याच्या जागता पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 07:20 PM2021-10-03T19:20:04+5:302021-10-03T19:20:19+5:30
आरेत प्रामुख्याने कुत्रे व इतर प्राणी कचराकुंडीच्या बाजूला अथवा इतरत्र पसरलेल्या उघड्यावरील कचऱ्यात वावरताना दिसतात व सदर प्राण्यांच्या भक्षणासाठी बिबट्या येत असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले आहे अशी माहिती तावडे यांनी दिली.
- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-गेल्या काही दिवसापासून आरे कॉलनी मधील नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून गेल्या महिनाभर सहा नागरिकांवर त्याने हल्ला केला आहे. एका बिबट्याला जरी पिंजऱ्यात पकडण्यात वन खात्याच्या अधिकाऱ्यांना जरी यश आले तरी अजूनही येथे किमान सहा ते सात बिबट्यांचे वास्तव्य असून आरे येथील विसावा,युनिट क्रमांक सात तसेच प्रभाग क्रमांक 52 येथील दूरदर्शन सोसायटीत नागरिकांना बिबट्या दिसला होता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे.
त्यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी आरे कॉलनीत वनखात्याने आधी लावलेले तीन पिंजरे अजून ठेवले आहेत.तसेच बिबट्यापासून येथील नागरिकांच्या संरक्षणासाठी वन खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथे जागता पहारा ठेवला आहे. तर आरे पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरिक्षक ज्योत्स्ना देसाई व त्याचे सर्व सहकारी ,तसेच पी दक्षिण वॉर्डचे म.न.पा चे सर्व अधिकारी व कर्मचारी येथे कार्यरत आहेत.
आरेत बिबट्याच्या हालचाली लोकमत ऑन लाईन आणि लोकमत मधून सातत्याने प्रसिद्ध करून वनखाते आणि लोकप्रतिनिधीं,आरे पोलिस व पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
येथील बिबट्यांना पकडून नॅशनल पार्क येथे सोडण्यात यावे यासाठी या विभागाचे स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आरे कॉलनीत संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नागरीकाना बिबट्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती वनविभागामार्फत विविध ठिकाणी बॅनर लावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी आरेत जातीने लक्ष घालून येथील नागरी वस्तीतील व जवळील रस्ते व पाय वाटा वरील व त्यालगतची असलेली झाडेझुडपे व गवत काढून साफसफाई केली आहे. तसेच नागरिकांना त्यांच्या वस्तीत आमदार वायकर यांच्या वतीने व महानगरपालिकेच्या सहकार्याने कचऱ्याचे डबे देण्यात आलेले आहेत. नागरिकांनी कचऱ्याच्या डब्यातच कचरा टाकावा व डब्याचे झाकण असल्यास ते बंद करून घ्यावे असे आवाहन प्रभाग क्रमांक 53चे शाखाप्रमुख विलास तावडे यांनी लोकमतला सांगितले.
आरेत प्रामुख्याने कुत्रे व इतर प्राणी कचराकुंडीच्या बाजूला अथवा इतरत्र पसरलेल्या उघड्यावरील कचऱ्यात वावरताना दिसतात व सदर प्राण्यांच्या भक्षणासाठी बिबट्या येत असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले आहे अशी माहिती तावडे यांनी दिली.
आरे परिसरातील रस्त्यावर लाइटची व्यवस्था तसेच अदानी इलेक्ट्रिकल व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पथदिवे लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत अशी माहिती प्रभाग क्रमांक 52 चे शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी दिली. बिबट्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन नागरिकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आपण सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले.