मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्स्प्रेस १९ जानेवारीपासून सुरू झाली. या एक्स्प्रेसला तीन दिवसांत प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई खासगी तेजस एक्स्प्रेस फुल्ल भरून जात आहे. त्यामुळेच या प्रवासात प्रवाशांच्या विरंगुळ्यासाठी चित्रपट आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी बॉडी मसाज अशा विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. दरम्यान, तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच दिवशी एका विनातिकीट प्रवाशाला पकडण्यात आले.रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने मुंबई-अहमदाबाद खासगी तेजस एक्स्प्रेस चालविण्यात येते. या एक्स्प्रेस मिनी थिएटर आणि इलेक्ट्रॉनिक बॉडी मसाज चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आयआरसीटीसीद्वारे एका संपूर्ण डब्यात मिनि थिएटर उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रवासी एका बाजूला आणि सिनेमाचा पडदा एका बाजूला असणार आहे. या सुविधेसाठी एका खासगी थिएटर कंपनीशी करार करण्यात येणार आहे. त्यांच्याद्वारे एक्स्प्रेसमध्ये थिएटरचे वातावरण निर्माण केले जाणार आहे. सध्या मिनि थिएटर बघण्यासाठी किती शुल्क लागेल, याचे नियोजन केले जात आहे. यासह प्रत्येक प्रवाशाला स्वतंत्ररीत्या प्रवास चित्रपट बघण्यासाठी थ्रीडी ग्लासेसची व्यवस्था करण्यात आली आहे. १५ मिनिटांसाठी ९० रुपये शुल्क यासाठी लागणार आहे. सध्या प्रवाशांसाठी ही सुविधा मोफत दिली जात आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबई ते अहमदाबाद या प्रवासात प्रवाशांना आळस येऊ नये, त्यांचा थकवा दूर करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. बॉडी मसाज चेअर ही अक्युप्रेशर तत्त्वावर काम करते. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. शरीराच्या मसाजसाठी १०० रुपये आणि फक्त पायांच्या मसाजसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच दिवशी एका विनातिकीट प्रवाशाला पकडले. त्यांच्याकडून तिकिटाची रक्कम आणि इतर अधिक रक्कम दंड स्वरूपात वसूल करण्यात आली.चांगला प्रतिसादमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसला पहिल्या दिवसापासून प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. १९ जानेवारी रोजी अहमदाबाद ते मुंबई या दरम्यान ८७१ प्रवाशांनी प्रवास केला, तर मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान ९२१ प्रवाशांनी प्रवास केला. २० जानेवारी रोजी अहमदाबाद ते मुंबई या दरम्यान ८६० प्रवाशांनी प्रवास केला, तर मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान ७८६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
तेजस एक्स्प्रेसमध्ये बघा चित्रपट, घ्या बॉडी मसाज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 7:04 AM