विनापरवाना पार्ट्यांवर वॉच
By admin | Published: December 30, 2015 03:40 AM2015-12-30T03:40:01+5:302015-12-30T03:40:01+5:30
थर्टीफर्स्टच्या रात्री पार्टीमध्ये दारूचा समावेश असेल किंवा तिकीट विक्री करून पार्टीचे आयोजन केले असेल, तर सावध राहा. कारण अशा पार्ट्यांवर प्रशासनाची करडी नजर असून परवाना नसलेल्या
- चेतन ननावरे, मुंबई
थर्टीफर्स्टच्या रात्री पार्टीमध्ये दारूचा समावेश असेल किंवा तिकीट विक्री करून पार्टीचे आयोजन केले असेल, तर सावध राहा. कारण अशा पार्ट्यांवर प्रशासनाची करडी नजर असून परवाना नसलेल्या आयोजकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
आयोजित पार्टीत सामील होण्यासाठी तिकीट विक्री होत असेल तर आयोजकांना मनोरंजन कर विभागाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. तिकिटाच्या २५ टक्के रक्कम ही मनोरंजन कर म्हणून आकारली जाते. पार्टीमध्ये मद्याचा समावेश असेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना असणे बंधनकारक आहे. मद्याचा समावेश असलेल्या एका पार्टीसाठी प्रशासन १३ हजार २५० रुपये शुल्क आकारते. या परवान्यात पार्टीचे ठिकाण, किती दारू वापरणार यांसह काही गोष्टींचा खुलासा आधीच करायचा असतो. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागते.
पहाटेपर्यंत बार सुरू ठेवण्यात येऊ नयेत! - हिंदू जनजागृती समिती
थर्टीफर्स्टला पहाटे ५ वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची शासनाने दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी रात्रभर बार सुरू ठेवू नयेत, असे समितीचे म्हणणे आहे.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करताना केवळ महसूल वाढीसाठी अशा प्रकारांना परवानगी देणे चुकीचे असल्याचे मत समितीने व्यक्त केले.
रात्रभर बार सुरू ठेवल्याने राज्याचा कोणता सर्वांगीण विकास, समाजहित साधले जाईल, असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. ३१ डिसेंबरला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने ३५ हजारांहून अधिक पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.
हा शक्ती आणि पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप समितीने केला आहे. गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी अशा प्रकारचा बंदोबस्त तैनात केला, तर गुन्हेगारी कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल, असा खोचक सल्लाही समितीने शासनाला दिला आहे.
उपनगरात पार्ट्यांचे अधिक प्रमाण
डिसेंबर २०१४ मध्ये मुंबई शहरात ९३२ आयोजकांनी मद्याचा समावेश असलेल्या एकदिवसीय पार्टीचे आयोजन केले होते. तर उपनगरात डिसेंबर २०१४ मध्ये परवाने घेतलेल्या आयोजकांची संख्या १ हजार ४५६ इतकी आहे.
यावरून उपनगरात खासगी पार्ट्यांचे आयोजन अधिक प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येते.
कोट्यवधी लीटर दारू
सेलीब्रेशनच्या नावाखाली थर्टीफर्स्टला दारू रिचवणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. त्यातही मुंबईत देशी दारू, विदेशी दारू आणि वाइनहून अधिक मागणी ही बीयरला असल्याचे आकडे सांगतात. शहर आणि उपनगर मिळून गेल्या वर्षी केवळ डिसेंबर महिन्यात कोट्यवधी लीटर दारूची विक्री झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.
डिसेंबर २०१४ मधील मद्यविक्री-
मद्याचा प्रकारशहर (लीटर)उपनगर (लीटर)
बीयर१८,२५,३१५४५,९७,०००
विदेशी११,३४,४४९२३,९२,०००
देशी९,१४,४०३२०,८२,०००
वाइन७७,९४५१,६६,०००