मुंबई - मुंबईतीलओला-उबेर व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या सोमवारपासून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने संपाची हाक दिली आहे. आठ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संपावर असलेल्या ओला-उबेरच्या चालकांनी संपात सहभागी न झालेल्या एका चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चालकाला बेदम मारहाण करून उठाबशा काढायला लावल्याचं दिसत आहे.
अॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांचा संप आज मागे घेतला जाण्याची शक्यता
संपत पाटील असं मारहाण करण्यात आलेल्या चालकाचं नाव आहे. पुण्यातील चालक पाटील हे भाडे घेऊन मुंबईत आले असताना भांडूपमध्ये संपात सहभागी झालेल्या काही ओला-उबेरच्या चालकांनी त्यांना मारहाण केली. मात्र पाटील पुण्यात परतल्यानंतर त्यांच्या मित्रांनी मारहाणीचा व्हिडीओ पाहिला आणि पाटील यांना घेऊन सोमवारी पुन्हा भांडूप गाठलं. तसेच मारहाणीची पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.
आठ दिवसांपासून वेठीस धरलेल्या मुंबईकरांना मंगळवारी ( 30 ऑक्टोबर) सकाळीदेखील पर्यायी वाहतूक व्यवस्थेने कार्यालय गाठावे लागले. सोमवारी आठ तासांहून अधिक काळ झालेल्या बैठकीत अॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांच्या सुमारे 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र अॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांच्या अन्य प्रश्नांबाबत परिवहन आयुक्तांच्या बैठकीनंतर संपाबाबत भूमिका ठरवण्यात येणार आहे. यामुळे मंगळवारी सकाळी अॅप बेस्ड टॅक्सी प्रवाशांसाठी ‘ऑफलाइन’ राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.