Join us

येऊरमध्ये पोलिसांचा जागता पहारा

By admin | Published: August 02, 2014 1:11 AM

पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाची ओढ तरुणाईला अधिक असते. त्यातच त्यांना धबधब्याचे आकर्षण असल्याने ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील तरुणाई वन-डे पिकनिकसाठी येऊरकडे धाव घेते

पंकज रोडेकर, ठाणेपावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाची ओढ तरुणाईला अधिक असते. त्यातच त्यांना धबधब्याचे आकर्षण असल्याने ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील तरुणाई वन-डे पिकनिकसाठी येऊरकडे धाव घेते. तेथे कळत-नकळत छेडछाडीमुळे होणाऱ्या विविध घटना लक्षात घेऊन यंदाही ठाणे शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून धांगडधिंगा करणाऱ्या तरुणाईवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शस्त्रधारी पोलिसांचा जागता पहारा तैनात करण्यात आला आहे.येऊर हे नेहमीच ठाणेकरांसह आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना आपल्या निसर्गाने खुणावत असते. यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्यानंतरही वन डे पिकनिकसाठी येऊर हेच एक उत्तम पर्याय ठरत आहे. या ठिकाणी पिकनिकला गेल्यावर ओल्या पार्ट्यांवर तरुणाईमध्ये काही वादावादी आाणि छेडछाडीच्या प्रकारातही वाढ होताना दिसते. त्यातून तरुणाई हातघाईवर येऊन एकमेकांची डोकी फोडते. तसेच तेथील धबधब्यात गेल्यावर हुल्लडबाजीत ती अडकण्यासाठीही भीती असते. गेल्या काही वर्षांपासून येऊर परिसरात पावसाळ्यात घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी यंदा अशा घटना घडू नये, म्हणूनच खबरदारी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी उपवन आणि येऊर येथे पावसाळ्यात पेट्रोलिंग वाढवली आहे. जे.एम. फॉर्मस् येथून येऊरच्या धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोरखंड बांधून तसेच शस्त्रधारी जागता पहारा ठेवून तरुणाईवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. पावसाळ्यात दारूच्या नशेत तरुणाईत होणारी हाणामारी आणि वादावादीच्या प्रकारांच्या घटनांबरोबर २६ जुलै २००५ रोजी येऊर येथे पिकनिकसाठी गेलेले ३० ते ४० जण येऊरच्या धबधब्याजवळ अडकले होते. त्या वेळी ठाणे पोलीस, वन विभागाने तारेवरची कसरत करून त्यांना वाचवले होते. त्याचबरोबर हा परिसर जंगलमय असल्याने तेथे जंगली प्राण्यांची भीती असल्याने एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह ७ ते ८ कर्मचाऱ्यांचा जोगता पहारा ठेवल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.